कोकण / दिपक कारकर :- कलेचा वारसा लाभलेल्या कोकणातील जाखडी नृत्य (शक्ती - तुरा) कलेचे नाव अजरामर करणारे शाहिरी रत्न म्हणजे लोकशाहीर स्व. तुकाराम मानकर होय. कोकणच्या पारंपारिक जाखडी नृत्याच्या डबलबारीच्या सामन्यांत पौराणिक ग्रंथ, पुराणाच्या आधारे शास्त्राचा आधार घेऊन कलगीतुरा जाखडी- नृत्याचा रंग ज्यांनी खऱ्या अर्थाने ह्या कलेत भरला. कलगी - तुरा क्षेत्रामध्ये वयाची ५० वर्षे हुन अधिक प्रचंड जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम या भगीरथ प्रयत्नांतून रंगभूमीशी एकजीव राहिलेले लोकशाहिर स्व. तुकाराम मानकर हे शक्ती-तुरा जोपासणारे कमालीचे खरे मानकरी होते.
शंभू राजू घराण्यातील गुरुवर्य कै. बाजी पांडुरंग यांचे शिष्य विविध पुरस्कारांनी सन्मानित व महाराष्ट्र गौरव भूषण / रायगड भूषण लोकशाहीर स्व. तुकाराम मानकर यांच्या अर्ध पुतळ्याचा अनावरण सोहळा व गुरुवर्य बाजीराव मोंडे यांची २६ वी पुण्यतिथी असा सोहळा भोपळी, पेण (ता. माणगाव,जि. रायगड) येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे नेत्रदीपक स्वरूप असून भरगच्च कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला कलाविश्वातील मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लोकशाहीर स्व. तुकाराम मानकर यांच्या शिष्य परिवार, सहकारी व हरिओम नृत्य कलापथक यांनी केले आहे.
