रायगड / प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रात सध्या संघटन पर्व सुरु आहे. ज्यामध्ये दीड कोटी सदस्य बनविण्याचे पक्षाने उद्दिष्ट ठेवले असून विविध माध्यमांतून महाराष्ट्रातील जनतेला भाजपाची विचारधारा पोहोचवून पक्षाकडे आकर्षित करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे, त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून भाजपा स्फूर्तिगीत तयार करण्यात आले आहे. या ऊर्जादायी गाण्याचे विमोचन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सदस्यता महाअभियान २०२५ अंतर्गत आयोजित संघटन पर्व कार्यशाळा या भव्य कार्यक्रमात करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असून सर्वप्रथम राष्ट्र नंतर पक्ष व शेवटी स्वतः ही भारतीय जनता पार्टीची विचारधारा सामान्य लोकांपर्यंत पोहचावी आणि देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील पक्षाला कार्यकर्त्यांचे अधिकाधिक बळ देण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम भाजपा करीत आहे. भाजपा पक्ष देशाला विकासाची दिशा देण्याचे काम करीत आहे, त्यामुळे त्यात जास्तीत जास्त लोक जोडून यावेत, यासाठी स्फूर्तिगीताची कल्पना राबविण्याचा निर्णय घेतल्याचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
संकल्पनेतील उज्ज्वल भारतासाठीचे भाजपाचे ध्येय, कार्यशैली, लोकनेते तसेच कार्यकर्त्यांची एकनिष्ठता आणि त्यांचे पक्षाप्रती असलेले समर्पण यांचे छान शब्दांत वर्णन आणि चित्रिकरण करण्याचा प्रयत्न या प्रेरणादायी गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न भाजपाने केला असून या गाण्यातून अनेक सभांच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना नक्कीच आपल्या पक्षाप्रती आदर वाढेल आणि प्रेरणा मिळेल असा विश्वास कार्याध्यक्ष चव्हाण यांनी व्यक्त केला. स्फूर्तिगीतातून भाजपा संघटन वाढविण्याचा हा कलात्मक प्रयत्न असल्याचे प्रतिपादन रवींद्र चव्हाण यांनी केले. पक्ष संघटनेच्या माध्यमातून आणि समाजमाध्यमांवरून भाजपाचे हे स्फूर्तिगीत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
