* हजरत सैय्यद अमीर शहाबाबांचा चुकीचा उल्लेख केल्याने मुस्लिम समाजात आक्रोश
* आम्हाला जागेची मालकी नको दर्गेची सेवा करण्याची गावकी हवी - मन्सुर पटेल
पनवेल / साबीर शेख :- पनवेल ओवे येथील मुस्लिम समाजाचे श्रद्धेय स्थान असलेले हजरत सैय्यद अमीर शहाबाबा दर्गा स्थळ 300 वर्षांपासून अस्तित्वात आहे. वक्फ दफ्तरी हजरत सैय्यद अमीर शहाबाबा यांच्या नामाचा उल्लेख हाबीर शहा केल्याची माहिती समजताच ओवे येथील बाबांच्या अनुयायी व मुस्लिम समाजाने आक्रोश व नाराजी व्यक्त केली आहे.
वर्ष 2016 पासून ओवे ग्रामस्थ व सध्या स्वतःला ट्रस्टी म्हणणारे हाजी मुस्ताक पटेल, असिफ पटेल व अतिक पटेल, तसेच अन्य त्यांच्याच पटेल कुटुंबियांचा दर्ग्यांवरील ताबा व वाढता दबाव, वादविवाद, अंकुश पाहता अनेक विषयांना वाचा फुटली आहे. त्या संघर्षात बाबांची अनेक वर्षे सेवा करणारे अल्पसंख्याक समाजाचे नेते ग्रामस्थ मन्सुर पटेल यांनी गाववाल्यांच्या सहमतीने नव्याने केलेल्या दर्गा नोंदणी प्रक्रियेच्या कागदपत्रांची पाहणी केली असता त्यात अनेक आक्षेपार्ह नोंदी निर्देशनात आल्या असल्याचे पुरावे सादर केले.
संतांचे नाव बदलणे, दर्गाचा सर्व्हे नंबर वेगळा दाखविणे, स्थानिक ग्रामस्थ दर्गा कारभारी शिष्टमंडळाला विश्वासात न घेता वक्फच्या कार्यालयातर्फे कागदोपत्री पंचनामा तयार करण्यात आला आहे. त्यात काही पंच साक्षीदारांच्या आक्षेपार्ह स्वाक्षरी असल्याचे आढळल्याने संपूर्ण गाव संताप व्यक्त करण्यासाठी एकवटला गेला होता, त्या बाबतीत काही पुरावे ही दाखविण्यात आले. अशा एक ना अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी 23 फेब्रुवारी रोजी संतप्त ग्रामस्थांनी दर्गा परिसरात सामूहिक गाव बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यात वक्फ व प्रशासकीय दप्तरी स्वयंघोषित ट्रस्टी सांगणाऱ्या नोंदी तात्काळ रद्द करण्यात याव्या व नव्याने ओवे ग्रामस्थांना विश्वासात घेऊन ट्रस्ट बनवावी अशी प्रमुख मागणी एकमताने करण्यात आली. तसेच सदर दर्गा ट्रस्टच्या मालकी व जबाबदारी संबंधितांच्या संशयित कागदपत्रांची तातडीने चौकशी व्हावी, यासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्त, अल्पसंख्याक आयोगाकडे मागणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. या बाबतीत दूरध्वनीद्वारे माध्यमांनी माहिती ट्रस्टीकडे विचारली असता हे सर्व आरोप खोडत असिफ पटेल यांनी विरोधकांनी कोर्टात आरोप सिद्ध करावे, अशी प्रतिक्रिया दिली.
मन्सुर पटेल यांनी मुस्ताक, अतिक, असिफ पटेल, आशपाक खमसे, पापा पटेल यांच्या गैरकारभाराविरुद्ध पुरावे सादर करीत पर्दाफाश करतांना अनुयायांच्या श्रद्धेय आस्था, सुफी संतांच्या गरिमेला कोणीही गाळबोट लावण्याचा प्रयत्न केलेला कदापी सहन केला जाणार नाही असे सांगितले. यावेळी मन्सुर पटेल, मुख्तार पटेल, मुदसिर पटेल, एजाज पटेल, साजिद पटेल, खालीद पटेल, सुभान पटेल, शोएब पटेल, फहीम पटेल, इम्रान पटेल व अन्य ग्रामस्थ, ज्येष्ठ श्रेष्ठ कारभारी मंडळ उपस्थित होते.
