सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो..
सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो ...||
घाम शेतात आमचा गळ..
चोर आयतच घेऊन पळ..
धन चोरांचा हा पळण्याचा फाटा कुठ आहे हो....||
सांगा धनाचा साठा...
न्याय वेशीला टांगला, माल त्याचा की आमचा वदा..
करा निवाडा आणा तराजू काटा कुठे आहे हो...||
सांगा धनाचा साठा...
लोणी सारं तिकडं पळ..
इथं भुकेने जीव हा जळ...
दुकानवाले दादा आमचा आटा कुठे हाय हो ..||
सांगा धनाचा साठा..
इथं मिठात मिरची आणि तुरी..
तिथं मुर्गी काटा सुरी..
सांगा आम्हाला मुर्गी कटलेस काटा कुठे हाय हो..||
सांगा धनाचा साठा...
इथं बिऱ्हाड उघड्यावर...
तिथं लुगडी लुगड्यावर
या दुबळीच धुडकं फडकं घाटा कुठ हाय हो ..||
सांगा धनाचा साठा...
शोधा सारे साठे चला...
आज पाडावाटे चला..
वामनदादा आमचा घुगरी घाटा कुठ हाय हो...||
सांगा धनाचा साठा....
शाहीर वामनदादा कर्डक यांची ही सामाजिक व्यथा आणि बळीराजाची हृदयकहानी सांगणारी शाहिरी रचना पाथर्डी (जि. अहिल्यानगर) येथील शाहीर भारत गाडेकर यांच्या पहाडी व बुलंद आवाजामधून ऐकण्याचा एक वेगळाच भावनिक प्रत्यय अनुभवला. निमित्त होते अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या सोळाव्या शब्दगंध राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे. या संमेलनाचे पहिल्याच सत्रात शाहीर भारत गाडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गायिलेला शाहिरी जलसा ऐकताना अत्यंत भावविभोर अवस्था झाली, विशेष म्हणजे "भलरी म्हणा रे, म्हणा, धरा सुरात ठेका, शिवार राख्या गोफण फेका" हे भलरी प्रकारातील कृषिवलांच्या श्रमप्रतिष्ठेवर वास्तव दर्शन घडवून आणणारी रचना शाहीर गाडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ढंगदारपणे गायिली.
महाराष्ट्र सारस्वतात शाहिरी वाड्:मयाला आदराचे स्थान आहे. शाहिरी वाड्:मयाचा इतिहास लिहीतांना सोळाव्या शतकापासून अभ्यास करावा लागेल. शिवछत्रपतींपासून शाहिरी काव्याचा उगम झाल्याचे इतिहासकार सांगतात. कदाचित त्यापूर्वीही पोवाड्यांचा वीररसाचा प्रवाह महाराष्ट्राच्या भूमीत वाहत असेल, पण छत्रपती शिवरायांनी या प्रवाहाला अधिक प्रभावी बनण्यासाठी प्रेरणा दिली.
"आनंदाने नांदत होते हिन्दू मुसलमान...
शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण..!
आनंदाने नांदत होते हिँदू मुसलमान ..!!
काळ्यारात्री तळपत होतं जिच्या रूपाचं उन,
अशी देखणी होती एका मुस्लीमाची सून,
त्या तरूणीला आई म्हणाला राजा तो शीलवान,
आनंदाने नांदत होते हिँदु मुसलमान....!!
बांधीत होता मस्जिद ईथे अन् तेथे मंदिर,
त्या शिवाच्या चरणी झुकले सदैव माझे शीर,
अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकते मान,
आनंदाने नांदत होते हिँदु मुसलमान...!!
वामनवाणी शिवरायाला करतो मी वंदन,
मला न आवडे जात आणि धर्माचे बंधन,
असाच माझा शिवबा होता माणुसकीची खाण,
आनंदाने नांदत होते हिँदू मुसलमान....!!!
महाकवि वामनदादा कर्डक यांच्या या गीताचे तन्मयतेने सादरीकरण करायचे, या गीतांला प्रचंड लोकप्रियता मिळाली. वामनदादांच्या गीतातील प्रत्येक शब्द नि शब्द आजच्या पिढीला मार्गदर्शक आहे. वामनदादांच्या कवितेने मानवतेचा ध्यास घेतलेला दिसून येतो. त्यांनी सामान्य माणसाच्या जीवनाचे सहजसुंदर काव्य साध्या, सोप्या भाषेत लिहिले आणि सादरीकरण ही केले.
महाराष्ट्रातील अनेक शाहीर-कवींनी फुले, शाहू, आंबेडकरांची समाजपरिवर्तनाची चळवळ समाजातील तळागाळापर्यंत नेली. त्यामध्ये वामनदादा कर्डक यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. त्यांच्या गीतांनी समाजप्रबोधन तर केलेच, पण सामाजिक परिवर्तनाची क्रांतिज्योत अखंड तेवत ठेवली. या ज्योतीने अनेक ज्योती उजळल्या. शाहिर भारत गाडेकर सुध्दा याच परंपरेतील एक क्रांतीज्योत आहे. आपल्या पहाडी आवाजाने समाजातील काळाकुट्ट अंधार नाहीसा करण्यासाठी मनापासून ती तेवत आहे.
वामनदादांनी आपल्या रचनांमध्ये समग्र बदल घडवून आणला. आशय आणि सादरीकरणात बदल केले. नव्या काळाचे नवे गाणे त्यांनी जन्माला घातले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉं. सुनील भंडगे म्हणतात, "वामनदादांची कविता ही लोककविता नाही. लोककवितेचा रचयिता ज्ञात नसतो. लोककविता म्हणजे वास्तवातील लोकांची कविता असा अर्थ नसून ’लोक’ याचा अर्थ ’समाज’ असा ध्वनित होतो. लोकपरंपरा जपणारे अनेक लोक आहेत. लोकवाङ्मयाचेही अनेक प्रकार आहेत. ‘गोंधळ’, ‘भारुड’, ‘लावणी’, ‘लळित’ आदी प्रकार हाताळणारे आणि जाणणारे समाज, असा लोकप्रवाहातील रचनाचा अर्थ घेतला तरीही वामनदादा यात बसत नाही. त्यांच्या कवितेत ’लोकमन’, ‘लोकरंग’ आणि ‘लोकढंग’ आहे, पण त्याची ‘लोककविता’ नाही." हाच लोकरंग, लोकमन आणि लोकढंग शाहीर भारत गाडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सादरीकरणात मला प्रकर्षाने जाणवला.
वामनदादा म्हणतात, “मी चातुर्वर्णाची चौकट तोडली. तसाच मी काव्यशास्त्राच्या चौकटीतून मुक्त आहे. तरी गाणं म्हटलं की, यमक आलंच. संपूर्णपणे यमकाचं बंधन तोडता येत नाही. मी संगीतशास्त्राचे नियमदेखील तोडले आहेत, तरी आमच्यादेखील गाण्याला एक शास्त्र आहे. गौतम बुद्ध, महात्मा फुले, डॉं. बाबासाहेब आंबेडकर जमेल तसे गायनातून सांगणे एवढेच माझे काम. तरी मानवी जीवनाच्या कप्प्या-कप्प्यात शिरून मी लिहीत आलो. मी माणसांचंच गाणं गात आलोय. माणसांनीच ते मान्य केलंय.” ते प्रांजळपणे सांगतात, ’‘मी प्रेमाच्या परवडीची गाणी गात नाही आणि माझं गाणं फारसं बोचरंसुद्धा नसतं. मी वाङ्मयीन मूल्याची मुळीच पर्वा केलेली नाही. एक तळमळणार्या माणसाची तळमळ म्हणूनच मी माझी गाणी प्रकाशित करीत आलो.” हीच अंतःकरणातून उत्स्फूर्तपणे निघालेली तळमळ शाहीर गाडेकर यांच्या सादरीकरणात मला आवर्जून दिसली.
वामनदादांच्या कवितेने मानवतेचा महान धर्म शिकवला. त्यांनी सामान्य माणसाच्या जीवनाचे सहजसुंदर काव्य लिहिले ते साध्या, सोप्या भाषेत तसेच तळातल्या घटकांना समजेल उमजेल असे लिहीत असत. माणसाचा जन्म, त्याचे सुख-दुःख, त्याचा प्रपंच, कर्तृत्व, त्याच्या जीवनाचे सार आपल्या वास्तव कवितेतून त्यांनी प्रांजळपणे मांडले.
’वंदन माणसाला’ ही वामनदादांची रचना अत्यंत उत्कटतेने शाहीर भारत गाडेकर गातांना दिसले. या कवितेत वामनदादा म्हणतात...,
‘वंदन माणसाला, वंदन माणसाला, दे कायेचे अन् मायेचे चंदन माणसाला, कुणी बनविले धनी, कुणाला कुणी बनविले दास, कष्टकर्यांच्या गळी, बांधला कुणी गुलामी फास, वामन ऐक आता सांगे भीमगाथा, जीर्ण पिढीचे नको रूढीचे बंधन माणसाला!’
वामनदादांची गीते अन्याय-अत्याचाराच्या विरोधात आत्मप्रत्ययाची ऊर्मी निर्माण करतात. समाज पुरुषाचे आत्मभान जागवण्यासाठी त्यांची गीते मशाल होतात.
ते म्हणतात...
'’माणसा इथे मी तुझे गीत व्हावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे... तुझे दुःख सारे गळूनी पडावे, एकाने हसावे लाखाने रडावे, जुने सारे सारे असे ना उरावे...’
अंधारकोशात गुरफटलेल्या अवघ्या शोषित, पीडित, दु:खित जीवांना, मानवी समूहांना मुक्त करणारा हा विचार वामनदादांनी अतिशय सोप्या भाषेत परंतु, वजनदार शब्दांत मांडून आपल्या कवनातील प्रचंड ताकद दाखवून दिली आहे. वामनदादांच्या लेखणीची प्रेरणा आणि धारणा मनापासून जपत शाहीर भारत गाडेकर आपल्या शाहिरी कलेतून समाजप्रबोधनाची मशाल चेतवत आहेत.
शाहीर भारत गाडेकर जातीभेद, उच्चनीचता याविरोधात सातत्याने पेटलेला अंगार रंगमंचावर बेभान होऊन सादर करतात.वामनदादांची क्रांतिगीते सादर करून ते आजच्या धर्म द्वेषाची बीजे समुळ नष्ट करतील, असा विश्वास व्यक्त केला तर तो वावगा ठरणार नाही.
आपल्या सुरेल व बहारदार पहाडी आवाजात 'शब्दगंध' शाहिरी जलसा शाहीर भारत गाडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शब्दशः मंत्रमुग्ध केला. सभागृहातील उपस्थित सर्वच श्रोते तल्लीन झाले होते. "टाटा बिर्ला बाटा कुठे आहे हो, सांगा धनाचा साठा अन आमचा वाटा कुठे आहे हो" हे गीत संपताच सभागृहात टाळ्यांचा अक्षरश: पाऊस पडला. एकापेक्षा एक सरस लोकगीतांची मैफिल मनाला उल्हसित करणारी ठरली. त्यांनी महाराष्ट्र गीत ही अत्यंत वीरश्री युक्त स्वरात सादर केले.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी हार्मोनियम सचिन साळवे व राजेंद्र चव्हाण यांनी दिलेली ढोलकीची साथ सुध्दा श्रोत्यांना चैतन्याची अनुभूती देणारी ठरली. तर कवी शशिकांत गायकवाड व दिगंबर गोंधळी, अशोक कानडे व प्रशांत सूर्यवंशी यांनी कोरसची साथ तन्मयतेने दिली. या संपूर्ण कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन भगवान राऊत यांनी केले होते, एकुणच शब्दगंध साहित्य संमेलनाची पहिल्या सत्रातील या शाहिरी मेजवानीचा सर्वांनीच मनापासून पोटभरून आस्वाद घेतला, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे व सचिव सुनील गोसावी यांनी घडवून आणलेला योग निश्चितच कौतुकास्पद आहे. यानिमित्ताने सर्व शब्दगंध महानुभावांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो व धन्यवाद देतो.
* डाॅं. सुनीलकुमार सरनाईक
भ्रमणध्वनी:९४२०३५१३५२
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत)