* महिला प्रदेश कार्यकारिणीची निवडणुक उत्साहात
* यवतमाळ उमरखेडच्या सविता चंद्रे ग्रामीण प्रदेशाध्यक्ष
* कार्याध्यक्ष पदावर प्रतिभा शेलार, धोंडगे यांची निवड
* जिल्हाध्यक्ष आणि राज्यकार्यकारिणीची लवकर निवड
मुंबई / प्रतिनिधी :- व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी नुकतीच निवडणूक संपन्न झाली. नाशिकच्या रश्मी मारवाडी या सर्वाधिक मते घेऊन प्रदेशाध्यक्ष पदासाठी निवडून आल्या तर दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवून सविता चंद्रे उमरखेड यवतमाळ या प्रदेशाध्यक्ष ग्रामीण या पदासाठी दावेदार ठरल्या आहेत. पुण्याच्या स्वाती धोंडगे आणि सातारा येथील प्रतिभा शेलार या कार्याध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. स्वाती धोडगे, सविता चंद्रे, रश्मी मारवाडी, प्रतिभा शेलार या चार महिला उमेदवारांनी या निवडणुकीत सहभाग नोंदविला होता.
महाराष्ट्रातील महिला सदस्यांनी गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी आपला मतदानाचा हक्क बजावला. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पसंती क्रमानुसार मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला. ऍंड. संजीव कुमार कलकोरी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम केले. राष्ट्रीय, राज्य प्रदेश कार्यकारिणीने नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून संघटनात्मक बांधणीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सर्व प्रकारच्या पत्रकारांचे मजबूत संघटन म्हणून व्हॉईस ऑफ मिडीया आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करीत असून मुद्रित माध्यमासोबत डिजिटल, इलेक्ट्रॉनिक, साप्ताहिक, रेडिओ, युट्यूब, महिला विंग अशा विविध शाखा कार्यरत आहेत. या सर्व शाखांचा कारभार पाहण्यासाठी लोकशाही पद्धतीने कारभारी निवडण्याची प्रथा व्हॉईस ऑफ मिडीयाने स्थापनेपासून जपली असून त्याच प्रथेचा एक भाग म्हणून महिला प्रदेश कार्यकारिणीसाठी निवडणुक घेण्यात आली होती.
पत्रकारितेत महिलांचा सहभाग वाढविणे, महिला पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी पाठपुरावा करून सोडविणे, त्यांचे हक्क यासाठी संघटन कौशल्यपणाला लावून कामकाज करणे या ध्येय धोरणावर व्हॉईस ऑफ मिडीयाची महिला प्रदेश विंग कार्यरत आहे. ही निवडणूक पार पडल्यानंतर लवकरच नूतन कार्यकारिणी पदभार स्विकारून उर्वरित प्रदेश कार्यकारिणी जाहीर करून महिला जिल्हा अध्यक्षांची निवड करणार आहे.