* एकविरा संस्था व बी. के. फाउंडेशनचा "भूमिपुत्र सन्मान" मोठ्या उत्साहात संपन्न
वसई / नरेंद्र एच. पाटील :- कला, क्रीडा, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या एकविरा संस्था व बी. के. फाउंडेशन केळवणे (पनवेल) यांच्यातर्फे आगरी कोळी समाजातील "भूमिपुत्र व भूमिकन्या सन्मान सोहळा 2025" कामोठे, पनवेल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, जे. डी. तांडेल, "सुपली सोन्याची" फेम गायिका भागीरथी कोळी, हभप प्रकाश महाराज पाटील, भाजपा महिला आघाडीच्या वनिता पाटील, प्रा. भूमिका म्हात्रे , कलाकार धीरज शिंदे, माजी नगरसेवक प्रमोद घरत आदी उपस्थित होते.
व्यासपीठाच्या बाजूलाच आगरी संस्कृती, मासेमारीचे खरेखुरे प्रदर्शन लावले होते तोच धागा पकडून आमदार प्रशांत ठाकूर यांनी आगरी समाज बांधवांनी आपली संस्कृती टिकविण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, शहरीकरणाच्या विकासामुळे गावाचे स्वरूप पूर्णतः बदलून गेले आहे. आधुनिक यंत्र, मिक्सरच्या जमान्यात वाटण वाटण्याचा पाटा लोप पावला आहे. मिठागरेही बंद होत चालली आहेत. मच्छिमारी बंद होत चालली आहे. त्यामुळे पुढील पिढीला अशी होती बंदरे, पारंपारिक मच्छिमारी, अशी होती शेतीची कामे हे केवळ पुस्तकातूनच पहायला मिळेल. म्हणूनच संस्कृती जपणे आवश्यक असल्याचे सांगून ठाकूर यांनी आगरी समाजाचे कैवारी दि. बा. पाटील यांच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
भूमिपुत्र सन्मानमध्ये श्री वर्धनचे सिद्धेश रघुवीर, किशोर शिनाळे, पोलिस दलातील अमिषा म्हात्रे, मुरबाडचे कवी हरिश्चंद्र दळवी, वसईचे पत्रकार नरेंद्र एच. पाटील व कला शिक्षिका अक्षता पाटील, पनवेल, वाशी परिसरातील वंदना म्हात्रे, लेखिका जयश्री वाघ, रजनी मढेकर, अनंत जितेकर, वृषभ गोंधळी, भिवंडीचे कवी नितुराज पाटील, गायिका धनश्री पाटील, अमिषा पाटील तसेच मीठ पिकविणारे शेतकरी कुटुंब यांचा सन्मान करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष तेजस पाटील यांनी आपले मनोगत मांडताना अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून नवोदितांना व्यासपीठ मिळवून देऊन त्यांचे मनोधेर्य वाढविण्यासाठी एकविरा संस्थेची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले. तसेच संस्थेने आजवर अनेक कलाकार घडविल्याचा सार्थ अभिमान असल्याचे देखील त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एकविरा देवीची पालखी वाजत-गाजत व्यासपिठावर आणण्यात आली. तसेच गायिका भागीरथी कोळी यांच्या सुफली सोन्याच्या गाण्यावर सर्वानीच ताल धरला. त्यामुळे एक वेगळीच रंगत पहायला मिळाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित पाटील यांनी केले.
