* साले खुपच माजलेत ओ !
सध्या सांगली जिल्ह्यात कायदा-व्यवस्थेचा प्रश्न बिकट होत चाललाय. सगळे अवैध धंदे तेजीत आहेत. खासगी सावकारी, गुटखा, मटका, वाळू चोरी, सेक्स रॅकेट, खून, मारामा-या, ड्रग्ज विक्री, गावठी दारू, बनावट दारू विक्री सगळे सगळे खुलेआम सुरू आहे. सगळे बिनबोभाट सुरू आहे. अवैध धंदे करणारे हे सगळे समाजसुधारक सध्या तेजीत आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यात त्यांचा यथोचित मानसन्मान होतो. त्यांना प्राधान्याने सेवा मिळते. त्यांची योग्य पध्दतीने बडदास्त ठेवली जाते. सगळे कसे सुरळीत आहे. पण खरी अडचण आहे ती पत्रकारांची. पत्रकार साले माजलेत. काहीही गरज नसताना अवैध धंद्यांची बातमी लावतात. ड्रग्ज पकडल्याची, विक्रीची बातमी लावतात. गांजा विक्रीची बातमी लावतात. सगळे सुरळीत असताना पत्रकार या बातम्या लावून सामाजिक वातावरण कुलूषित करीत आहेत. अवैध धंदे करणारे समाजसुधारक आणि पोलिस यांच्यातला सलोखा गरज नसताना बिघडवत आहेत. समाजात जर शांतता हवी असेल तर या दोघांच्यात सलोखा असायलाच हवा ना ? कुठे हाफ मर्डर झाला, कुठे मर्डर झाला, चार-दोन रेप झाले तर काय बिघडते ? एवढ्याने काय फरक पडतो ? लगेच कायदा-व्यवस्था संपते का ? समाजसुधारकांनी त्यांच्या फायद्यासाठी समाज नासवला, दहशत निर्माण केली. गांजा विकला, दारू विकली तर काय फरक पडतो ? दारू पिऊन पिढ्या नासल्या तर फार मोठे राष्ट्राचे वाटोळे होणार आहे का ? हे सगळे नाही चालले तर अवैध धंदे करणारे समाज सुधारक श्रीमंत कसे होणार ? त्यांची घरे कशी चालणार ? या समाजसुधारकांच्या सामाजिक कार्यास पाठींबा दिल्याने, त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने पोलिसांना थोडेफार पैसे मिळाले तर कुणाच्या पोटात दुखायचं काय काम आहे का ? त्याला 'हप्ता' म्हणायची गरज आहे का ? राजीखुषीने दिलेल्या रकमेला 'हप्ता' म्हणून 'लक्ष्मी' ला बदनाम करतात साले पत्रकार. सगळे सुरळीत चाललेले असताना मिठाचा खडा का टाकावा या पत्रकारांनी ? एसपी साहेब खरंच पत्रकार साले माजलेत. चार-दोन पत्रकारांचे एन्काऊंटर कराच. त्याशिवाय जिल्ह्यात कायदा व्यवस्था असल्यासारखे वाटणार नाही. सर्वत्र शांतता असल्यासारखे वाटणार नाही. साहेब खरंच चार-दोन पत्रकारांचे कराच एन्काऊंटर. त्याशिवाय पोलिस खात्याचा धाक निर्माण होणार नाही. जिल्ह्यात पोलिस खाते सक्रीय असल्यासारखे वाटणार नाही.
एसपी साहेब हवे तर चार-दोन नव्हे दहा-बारा पत्रकारांचे एन्काऊंटर करा. ही जमात मेल्याने काही फरक पडणार नाही. यांच्यासाठी तुमच्यावर कुणी दबावपण टाकणार नाही. हे मेले म्हणून फार कुणी आकांड-तांडव करणार नाही. भले पत्रकारांच्या हजार संघटना असतील पण ते अशावेळी एकत्र पण येणार नाहीत. माझी संघटना मोठी की, तुझी संघटना मोठी असा वाद घालत बसतील. जे एकत्र येवून निषेध करायला येतील त्यातले काही जण तुम्हाला गपचुप येवून भेटतील आणि म्हणतील साहेब तुम्ही केलेत ते योग्यच केलेत. तसेच पाहिजे त्याला. कारण संघटनेच्या पत्रकारांसारखे व्यापक विचाराचे दुसरे कुणी नसते. पत्रकार एन्काऊंटर करून मारले म्हणून कुणी दगड घेवून पोलिस ठाण्यावर येणारही नाही. नेते नाटकी निषेध करतील. मिडीयासमोर तुमच्यावर कारवाईची मागणी करतील पण ती तोंडदेखलीच बरं का. त्यानंतर हळूच तुम्हाला फोन करून तुमचं अभिनंदही करतील. त्यामुळे त्यांचा निषेध, त्यांचे निषेधाचे धारधार भाषण अजिबात मनावर घ्यायचे नाही. बाकी या पत्रकार नावाच्या जमातीला कुणी धनी ना गोसावी. त्यांच्या वर्तमानपत्राचे, न्युज चँनेलचे मालकपण तक्रार करायला येणार नाहीत बरं का ? त्यामुळे बिनधास्त ठोका. पाच-दहा ठोकले की मग नाही कुणी विरोधात बातम्या देणार. तसेही गेली दहा वर्षे या गड्यांच्या नांग्या बाहेर आल्याच नाहीत. साले उगीचच बोंबलत असतात. 'धंदे' दोन नंबरचे असले तरी समाजासाठीच चालू असतात ना. एखाद्याने ड्रग्जच्या नशेत केला बलात्कार आणि असहाय्य तरुणीच्या गळ्यावरून चाकू फिरवत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर कुठे बिघडले ? मागे एकदा मिरजेत एकाने नशेत असे समाजकार्य केले होतेच ना. कॉलेजची मैदाने, खुल्या जागा, अंधारी बागा येथे बसून कोणी ड्रग्ज घेत असेल, कोणी त्यांना थोड्याशा मोबदल्यात ते पुरवत असेल, त्या वस्तू आणि त्याच्या वसुलीसाठी सावकारी पद्धतीने त्याच्या आई-बापाकडून वसुलीे केली जात असेल, काही हजार रुपये देऊन व्याजापोटी काही लाखांची रक्कम किंवा घर, इस्टेट लिहून कुणी घेत असेल तर कुठं बिघडतय ? सांगा ना साहेब, काय फरक पडतो इतक्याने ?
या सगळ्याच्या विरोधात बातम्या लावायची काय गरज आहे का ? इतके सगळे सकारात्मक काम चालू असताना पत्रकारांनी का बातम्या लावायच्या ? वातावरण नकारात्मक का करायचे ? पत्रकारांनी अशा बातम्या देऊन आगाऊपणा केल्यावर एखाद-दुसरा समाजसुधारक पत्रकारांच्या कार्यालयात कोयता, रॉड, रिव्हॉल्व्हर घेवून घुसतो. त्याने कोयत्याने, रॉडने पत्रकाराला ठोकले तर बिघडले कुठे ? मार देऊन उपकृत केले तर त्यात मोर्चा काढण्यासारखे, पोलिसांच्या नावाने बोंबा मारण्यासारखे काय आहे ? लगेच एसपींना निवेदन दे, जिल्हाधिका-यांना निवेदन दे, काय गरज आहे का या उलाघालींची ? दोन नंबरचे धंदे करणारे समाजसुधारक जे करतात ते चुकीचे करतात का ? ते ही रात्रंदिवस समाजासाठीच राबतात ना ? मग का पत्रकारांनी त्यात आपली टांग खुपसावी ? कशाला असल्या फंदात पडावे ? तरी पत्रकारांचे नशिब अजून म्हणावे तसे फळफळलेले नाही. त्यांच्यावर अजून हे समाजसुधारक पुर्णता प्रसन्न झाले नाहीत. ते प्रसन्न झाले तर चार-दोन पत्रकारांना गोळ्यासुध्दा घालू शकतात. त्यांनी चार दोन पत्रकारांना गोळ्या घालून स्वर्ग प्राप्ती करून दिली तर तेवढेच पुण्याईचे काम होईल ना त्यांच्या हातून ? हल्ली दोन चाकीवरून कुणी कुणाला साधी लिफ्टसुध्दा देत नाहीत. मग इथे तर थेट स्वर्ग दाखवायचा आहे. ते ही फुकटात. मग इतके पुण्याईचे काम समाजसुधारकांनी केले तर बिघडले कुठे ? असे कुणी केलेच तर त्याची शिफारस आपल्या खात्यामार्फत राष्ट्रपतीच्या हस्ते पारितोषिक मिळण्यासाठी व्हायला हवी बरं का एसपी साहेब. विनाकारण नकारात्मक बातम्या लावायच्या. बोंबा मारत बसायचं. कागदाच्या सुरळ्या करायच्या आणि याला भेट, त्याला भेट असल्या दुकानदा-या करायची काय गरज आहे का ? हे समाजसुधारक जसे पोलिसांना लक्ष्मीदर्शन देतात तसे पत्रकारांनीही गपचुप करून घ्यावे ना. तेवढेच घरात बायको खुष होईल. पोरा-ठोरांच्या अंगावर चांगली कपडे येतील. आता काही हूशार, प्रामाणिक पत्रकार मित्र लक्ष्मीदर्शन करून घेतात बरं का, पण ते थोडकेच असतात. त्यांच्यासारखे सगळेच हूशार नसतात ना. पण पत्रकारांनी करावे ना लक्ष्मीदर्शन. बायकापोरं सुखी होतील, घरात जरा भरभराट येईल. पोरा-ठोरांना चांगलं शिकवता येईल, चांगल्या शाळेत घालता येईल. बायकोच्या अंगावर तोळा तोळा सोने घालता येईल. कशाला हवेत फुकटचे भिकेचे धंदे. हे गावभर बोंबलत फिरतात. हे असे झाले, ते तसे झाले. घरात भाकरीला पिठ का नसेना, शाळेत पोरांची फी दिलेली नसते वेळेवर, पोराच्या गांडीवर कधी चड्डी व्यवस्थित नसते. गड्यांची स्वत:ची आतली चड्डी तर कधी सरळ असते का ? नेहमी दोन्हीकडे दोन भोके आणि हे जातात समाज नीट करायला. सगळ्या गावाचं उसणपासण घेवून घर चालवतात, घरी बायको रोज यांच्या नावाने खडे फोडते, बोटे मोडते. घरी गेले की दात-ओठ खाते. तिच तोंड बंद करता येत नाही आणि हे शहाणे जातात कायदा व्यवस्थेच्या गप्पा मारायला.
एसीपी साहेब पत्रकार हे सगळे जरा अतीच करतायत असे वाटत नाही का तुम्हाला ? काढा ना या एकदा सगळ्यांना ठोकून. जिथे जिथे पत्रकार असतील ना तिथे तिथे या साल्यांची नागडी धिंड काढा. गावातून काढा, नागडे करा साल्यांना आणि गावभर हिंडवा. त्यांची धिंड काढताना सगळे दारूवाले, गुत्तेवाले, गुटखावाले, मटकावाले, रेपवाले, मर्डर, रॉबरी वाले समाजसुधारक सजवलेल्या गाडीत बसवायला हवेत. तरच पत्रकारांना खरी अद्दल घडेल. साहेब, या पत्रकारांना खरंच एकदा त्यांची औकात दाखवाच. कशाला हव्यात ओ यांना फुकटच्या उचापत्या ? अवैध धंदे करणारे समाजसुधारक समाजाचे शत्रू आहेत का सांगा बरं ? आता तर त्यातले बरेच जण आमदार-खासदार होतात. मंत्री-संत्री होतात. खरे तर आमदार-खासदार व्हायला, मंत्री व्हायला हेच तर मेरिट लागते ना. इतके महत्वाच मेरिट जर या समाज सुधारकांच्याकडे असेल तर पत्रकारांनी का बोंबलावं ? त्यांना समाजाचे भले झालेले बघवतच नाही बघा. वाल्मिक कराडसारखा दादा हवा ना प्रत्येक जिल्ह्याला. माणसाने अशी प्रगती करावी. गडी काय होता ? काय झाला ? कुठल्या कुठे गेला ना ? आणि पत्रकार पेपरात चार रेघोट्या खरडतात, हातात दांडके धरून बोलतात म्हणजे लय शहाणे झाले का ? घर चालवता येत नाही आणि चालले वाल्मिक कराडवर बोलायला, कायदा व्यवस्थेवर बोलायला. खरंतर सगळ्या पोलिसांनी मिळून वाल्मिक कराडला गृहमंत्री करायची मागणी करावी. ते गृहमंत्री झाले तर ख-या अर्थाने राज्य प्रगतीपथावर जाईल. बाकी चोमडे पत्रकार काय कामाचे ओ ? नुसते खादीला कार आणि धरणीला भार. तेव्हा बिंनधास्त काढा ठोकून. भाड्यांचे कराच एन्काऊटर. या चांगल्या उपक्रमाची सुरूवात आपल्या सांगली जिल्ह्यातून झाली तर मोदी साहेब आणि अमित शहासाहेब तुमचा गौरव करतील याची पक्की खात्री आहे.
* दत्तकुमार खंडागळे
संपादक वज्रधारी
मो. 9561551006