खोपोली / दत्तात्रय शेडगे :- खालापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठेची असलेल्या तांबाटी ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेना शिंदे गटाचे नितीन कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे. या ग्राम पंचायतीवर सरपंच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडे असले तरी जास्तीची सदस्यांची संख्या ही मात्र शिवसेना शिंदे गटाकडे आहे.
या ग्राम पंचायतीच्या उपसरपंच असलेल्या शितल पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. यामध्ये सदस्य नितीन कदम यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आल्याने उपस्थित शिवसैनिकांनी जल्लोष साजरा करीत नवनिर्वाचित उपसरपंच नितीन कदम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. ग्रुप ग्रामपंचायत तांबाटीच्या कार्यक्षेत्रात झपाट्याने वाढत चाललेली औद्योगिक वसाहत राजकीय लोकांना आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी महत्वाची ठरते आहे.
या ग्राम पंचायतीची संपूर्ण सत्ता शिवसेना घेण्यासाठी धडपडत असतांनाच निवडणुकीच्या तोंडावर सध्याचे सरपंच अविनाश आमले हे शिवसेनेतून बाहेर पडत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात जात उमेदवारी मिळविली आणि त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध करून दाखविले असले तरी ग्रामपंचायतीच्या सदस्यांचे बहुमत मिळविण्यात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला यश न मिळाल्याने येथे शिवसेना शिंदे गट प्रबळ ठरल्यामुळे उपसरपंच पदासाठी त्यांच्यातील सदस्यांना सामावून घेण्यासाठी सध्या तडजोडीचे राजकारण सुरू असले तरी नवनिर्वाचित उपसरपंच हे मात्र सर्व बाजूने राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी फिट असल्याने त्यांच्या पदाचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी नक्कीच होईल, अशी चर्चा होतांना दिसत आहे.
यावेळी सरपंच अविनाश आमले, शितल पाटील, प्राजक्ता पाटील, सुगंधा जाधव, अस्मिता कदम, संतोष दळवी, सुरेश पवार, हरिभाऊ जाधव, अरूणा सावंत, रितेश मोरे, कविता मिरकुटे, ग्रामसेवक प्रशांत कदम यांच्यासह ग्राम पंचायतीचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाल्याने नितीन कदम यांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेनेचे खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील यांच्यासोबत आमदार महेंद्र थोरवे यांचे लहान बंधू विश्वनाथ उर्फ पप्पूशेठ थोरवे हे सुद्धा उपस्थित होते.
