* अनेक तक्रारी येऊन सुध्दा कारवाई शून्य
खालापूर / सुधीर देशमुख :- खालापुर तहसील कार्यालयातील आपले सरकार सेवा सेतु केंद्राच्या माध्यमातून दिले जाणारे दाखले, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठीचे दाखले तसेच शैक्षणिक बाबीकरीता, स्पर्धा परिक्षा देण्याकरीता, उत्पन्राचे दाखले, जातीचे दाखले तसेच आर्थिकदृष्टया मागास असल्याबाबतचे दाखले अशा विविध दाखल्यांची मागणी जनतेकडून होत असते. असे दाखले आपले सरकार सेवा केंद्र खालापुर सेतू कार्यालयाच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने दिले जातात, परंतु अश्या प्रकारचे दाखले खालापुर सेतू केंद्रातून देत असतांना मोठ्या प्रमाणात नागरीकांकडुन शुल्क (रक्कम) आकारणी केली जात असल्याची तक्रार व अनेक निवेदन सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांनी तहसीलदार अभय चव्हाण यांना दिले आहे. परंतु अनेक तक्रारी येऊन सुध्दा खालापूर सेतू केंद्राचा ठेकेदार व त्यांचे कर्मचारी यांच्यावर कोणतीच कारवाई आजपर्यंत झालेली नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जनतेत शंका निर्माण झाली आहे की तहसील कार्यालयाचे व सेतु केंद्राशी हितसंबध असल्याशिवाय त्यावर कारवाई होत नाही. प्रतिज्ञापत्र (शपथपत्र) नोंदणी पावती देत नाही, त्याचे शुल्क (सेवा शुल्क) या नावावर जनतेची लूट करतात. सेवा शुल्काचा अर्थ जनतेला सेवा देणे आहे. परंतु त्याच जनतेला हे सेतु केंद्रातले कर्मचारी सांगतात की, प्रतिज्ञा पत्र, अर्ज व रजिस्टर तुम्हीच तहसील अधिकारी यांच्याकडे घेऊन जावा. नोंदणी व सही करुन पुन्हा रजिस्टर व इतर पेपर घेऊन या. जर जनता स्वत: पायपीट करुन ही कामे करीत असतील तर त्यांना सेवा शुल्क मागण्याचा काय अधिकार आहे. सेतू केंद्रातील कर्मचारी हे जनतेशी हुज्जत घालत, चुकीची व दिशाभुल करणारी माहिती देतात, वेळेवर दाखले देत नाही. खालापुर सेतु केंद्र त्वरीत बंद करण्याची जनतेची मागणी वाढत आहे. दिवसेंदिवस तक्रारी वाढत असताना प्रशासन गप्प का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.