* विजेत्यांचा सन्मान
वसई / नरेंद्र पाटील :- वालीव ग्रामस्थ, सामाजिक शैक्षणिक व क्रीडा मंडळ आणि स्थानिक कामगार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कबड्डी स्पर्धा 2025 आणि होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात पार पडला. याच कार्यक्रमाच्या अंतर्गत धुरी इंडस्ट्रियल 1च्या मागे, आयपोल इंडस्ट्रियलजवळील मैदानात लेदर बॉल प्रशिक्षण केंद्राचे भव्य उद्घाटन वसई-विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सारंग मित्र मंडळाच्या वतीनेही या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन झाले.
या स्पर्धेत एकूण 30 संघ सहभागी झाले होते, ज्यामध्ये साईलीला विक्रोळीने प्रथम, साई श्रद्धा नालासोपाऱ्याने द्वितीय आणि जय बजरंग शेलार तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्यांना ट्रॉफी, पदक आणि रोख बक्षिसाने गौरविण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जिन्स आणि टी-शर्टचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी बोईसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजेश पाटील, माजी महापौर रूपेश जाधव, युवा विकास मंडळाचे संघटक सचिव हार्दिक राऊत, मनसे लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील, माजी नगरसेवक किशोर धुमाळ, माजी नगरसेवक सुनील अचोलकर, महेश घनगर, शंकर मिश्र, जगदीश सुतार आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात खेळाडूंचे कौशल्य बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रीडाप्रेमी उपस्थित होते. विशेषतः तरुणांमध्ये कबड्डीबद्दलची आवड आणि जिद्द स्पष्टपणे दिसून आली. खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ सादर करून स्पर्धेच्या भव्यतेत भर टाकली.
या भव्य आयोजनाचे प्रमुख आयोजक अरविंद पाटील सर, हिरेन सावला, सारंग मित्र मंडळ अध्यक्ष आणि बहुजन विकास आघाडी कार्यकर्ते राहुल घरत, आणि त्यांच्या टीमने सर्व मान्यवरांचे आभार मानले. तसेच ग्रामस्थांनी या मैदानाला "आई मांडवा देवी क्रीडांगण" नाव देण्याची मागणी केली.