उरणमध्ये शिवसंदेश यात्रा उत्साहात संपन्न


 * पत्रकार विठ्ठल ममताबादे यांच्या हस्ते संदेश यात्रेचे उदघाटन 

उरण / विठ्ठल ममताबादे :- संपूर्ण भारतात व देश विदेशात अध्यात्मिक व राजयोग संदर्भात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरिय विश्व विद्यालयातर्फे मार्गदर्शन केले जाते. भाविक भक्तांना अध्यात्म व राजयोगाचे योग्य ते मार्गदर्शन या विद्यालय (केंद्र) च्या माध्यमातून दिले जाते. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर करून समाजप्रबोधन करण्याचे काम ही संघटना (संस्था) करीत आहे आणि याच संस्थेच्या माध्यमातून अर्थातच प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय अंतर्गत राजयोगिनी तारादीदी यांच्या मार्गदर्शनाखाली उरणमध्ये महाशिवरात्रीचे औचित्य साधून शिवसंदेश यात्रा (शोभायात्रा) काढण्यात आली. पत्रकार विठ्ठल ममताबादे यांच्या हस्ते या शिवसंदेश यात्रेचे उद्घाटन झाले. 

श्रीफळ वाढवून, हिरवा झेंडा दाखवून या यात्रेची सुरूवात झाली. उरण शहरात स्वामी विवेकानंद चौक ते एनआय हायस्कूल, महात्वली, नागाव, विमला तलाव या मार्गांने ही शिव संदेश यात्रा काढण्यात आली. विमला तलाव येथे या यात्रेचा समारोप झाला. दरवर्षी शिव संदेश यात्रेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या शिव संदेश यात्रेत १०० हुन अधिक भाविक भक्त या यात्रेत सहभागी झाले होते. नागरिकांना, भाविक भक्तांना अध्यात्मिक ज्ञान मिळावे, राजयोगाची माहिती व्हावी, महाशिवरात्रीचे महत्व कळावे, अध्यात्म व राजयोगाचा प्रचार व प्रसार व्हावा या अनुषंगाने सदर शिव संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ब्रह्मकुमारी तारादीदी यांनी दिली. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे उरण तालुका अध्यक्ष रवीशेठ भोईर यांच्या हस्ते शिव ध्वजारोहण झाले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

महाशिवरात्रीच्या दिवशी अध्यात्मिक रहस्य या विषयावर ब्रह्मकुमारी तारादीदी यांनी भाविक भक्तांना मार्गदर्शन केले. उरण शहरातील पालवी हॉस्पिटलसमोर असलेल्या अयोध्या अपार्टमेंट, महानगर बँकेच्या वरती, पहिला मजला येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे केंद्र आहे. या ठिकाणी दररोज सकाळी ७ ते ९ व संध्याकाळी ५ ते ७:३० या वेळेत अध्यात्मिक ज्ञान व राजयोगाचे मार्गदर्शन विनामूल्य केले जाते. अशा या अध्यात्माचा व राजयोग मार्गदर्शनाचा नागरिकांनी, भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन ब्रह्मकुमारी तारादीदी यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post