पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार

 

* बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

* एकाचवेळी 23 जणांची नोकरी गेली

पुणे / प्रतिनिधी :- गावी निघालेल्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीचे नाव निष्पन्न केले असून त्याचा शोध घेण्यास पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत. दत्तात्रय रामदास गाडे असे या प्रकरणातल्या आरोपीचे नाव आहे.

पुण्यात घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोत बलात्काराची घटना घडली आहे. एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय प्रवासी महिलेवर बलात्कार झाला आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच या बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामुळे एकाचवेळी 23 जणांची नोकरी गेली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मोठी कारवाई केली आहे. 

स्वारगेट हे पुण्यातील सर्वात वर्दळीचे ठिकाण आहे. इथे नेहमीच मोठी गर्दी असते. अशातच स्वारगेट बस स्थानकात बलात्काराची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमधील सर्व सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. डेपोतील शिवशाही बसमध्ये बलात्कार प्रकरणी डेपोमधील तब्बल 23 सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे आदेश ही परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत. स्वारगेट डेपो मॅंनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांची चौकशी करुन या प्रकरणात एक आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत. परिवहन आयुक्तांकडे हा अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय होणार आहे. 

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी स्वारगेट बसस्थानकात जावून बसची पाहणी केली तसेच घटनेची माहिती घेतली. शिवशाही बसमध्ये पहाटे तरुणीवर बलात्कार झाला होता. याबाबत त्यांनी पोलिस आणि एसटी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांची पुणे पोलिस आयुक्तांसोबत फोनवरून चर्चा केली. तपास गंभीरपणे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.  

दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी जामीनावर बाहेर होता. पुण्यातील स्वारगेट स्थानकातून तरुणी फलटणला जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी नराधमाने तरुणीवर अत्याचार केला. आरोपीवर शिक्रापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीला फलटणला जाणारी बस आहे,  म्हणून दुसऱ्या बसमध्ये बसायला सांगण्यात आले होते. आता नराधमाच्या शोधासाठी आठ पथके तयार करण्यात आली आहेत.  

* पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील काय म्हणाल्या ?

पिडीत मुलगी पुण्यात काम करते. ती सातारा या ठिकाणी तिच्या गावी चालली होती. सकाळी साधारण पावणेसहाच्या सुमारास ती बसची वाट बघत होती. त्यावेळी आरोपी तिकडे गेला होता. आरोपी तिच्याशी बोलला असेही दिसत आहे आणि त्यानंतर तिच्या शेजारचा माणूस उठून निघून गेला हे देखील दिसत आहे. आरोपीने गोड बोलून तिच्याशी ओळख करुन घेतली आणि कुठे जाते आहेस असे विचारले त्यावर मुलीने फलटणला जायचे आहे. तर त्याने तिला सांगितले बस इथे नाही तर दुसऱ्या ठिकाणी लागते. चल मी तुला बसजवळ घेऊन जातो. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी आरोपीसह बसजवळ जाताना दिसते आहे.

* बसमधील अंधाराचा फायदा घेत आरोपीने केले दुष्कृत्य 

स्मार्तना पाटील पुढे म्हणाल्या की, बसमध्ये अंधार होता, त्यावर ती आरोपीला म्हणाली की या बसमध्ये तर अंधार आहे. तर आरोपी तिला म्हणाला ही बस रात्री आली आहे. लोक झोपले असतील म्हणून अंधार आहे. तुला हवे तर तू चेक कर. तिला बसमध्ये जायला सांगितले. सदर मुलगी अंधार का आहे हे बघायला आतमध्ये गेली. तेव्हा आरोपी तिच्या मागोमाग बसमध्ये शिरला त्याने बसचा दरवाजा लॉक केला आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी उतरुन गेल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. तसेच मुलगीही उतरली आणि बसने गावी जायला निघाली होती. या दरम्यान तिने हा प्रकार तिच्या मित्राला सांगितला. अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर तिने हा सगळा प्रकार मित्राला सांगितला. मित्राने तिला सांगितल्यानंतर ती आमच्याकडे म्हणजेच पोलिस ठाण्यात आली. तिच्या तक्रारीनंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले.

आरोपी हा शिरुर गावातला आहे असे कळले आहे. त्याची ओळख पटली आहे, त्याला शोधण्यासाठी आठ पथके रवाना झाली आहेत. डॉग स्क्वॉडही शोध घेत आहे, असे स्मार्तना पाटील यांनी म्हटले आहे.

* रुपाली चाकणकर यांनी दिली प्रतिक्रिया ?

पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. अनेक तालुक्यातील वाड्या-वस्त्यांमधून मुली शिकायला पुण्यात येत असतात. तसे पाहिले तर पुण्यात मुली कायम सुरक्षित राहिल्या आहेत. पुण्यात शिकायला येणाऱ्या मुलींना सुरक्षित वाटत असते. पण स्वारगेट येथे घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे.

* बंद शिवशाही बसमध्ये कंडोम, साड्या, शर्ट, चादरी :- 

बलात्कार प्रकरणातील आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. तर दुसरीकडे याच आगारात बंद स्थितीत असलेल्या शिवशाही बसमध्ये नेमके काय चालते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आगारात बंद असलेल्या शिवशाही बसेस उभ्या आहेत. त्या बसमध्ये ब्लँकेट्स, शर्ट, साड्या, अंतर्वस्त्रे आढळली आहेत. याच बसमध्ये वापरलेले कंडोम, त्यांची पाकिटेही सापडली आहेत. त्यामुळे बंद असलेल्या शिवशाही बसेसमध्ये नेमके काय प्रकार चालतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्वारगेट एसटी आगार परिसरात कायम वर्दळ असते. त्यामुळे या भागात एका बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाला आणि त्याची कुणकुण कुणालाच लागली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आगारात अत्याचार झाल्याची माहिती आगार प्रमुखांना देखील नव्हती. पीडितेने पोलिसांकडे तक्रार दिली. मग पोलिस आगारात तपासासाठी पोहोचले, तेव्हा आगार प्रमुखांना घडलेला प्रकार समजला.

* विविध राजकीय संघटनांचा एल्गार :-

यावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून येथील सुरक्षा रक्षक केबिनची तोडफोड करण्यात आली. महिला पोलिसांसह मोठा फौजफाटा येथे पाहायला मिळाला. काही वेळाने पोलिसांनी येथे ताबा घेत कार्यकर्त्यांना आगाराबाहेर काढले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मी स्वतः पुणे पोलिस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल, हा विश्वास महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनी, मातांना देतो. पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच पोलिस आयुक्तांबरोबर संपर्क साधला. त्यांना सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. आरोपीची ओळख पटल्यावर पोलिसांनी तातडीने तपास करून त्याच्या घरापर्यंत माग काढला, त्याच्या भावाला ताब्यात घेत त्याची माहिती मिळवली व त्यालाही अटक केली. आता त्याला कठोर शिक्षा होईल यासाठी पोलिस काळजी घेतील असे ते म्हणाले.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाजमाध्यमांवर याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुण्यात अनेकांची विविध कारणांनी ये-जा असते. त्यामुळे सगळीच बसस्थानके सतत गजबजलेली असतात. पोलिसांनी अशा वेळी अधिक जागरूक राहून विशिष्ट वेळांमध्ये सर्तक रहायला हवे. तसे पोलिसांना सांगण्यात येईल असे ना. पाटील यांनी म्हटले आहे.

शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले आहे. राज्यात सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे होत आहेत. याचे कारण गुन्हेगारांना आता पोलिसांचा, कायद्याचा काहीच धाक वाटत नाही हेच आहे. पोलिसांच्या कामात वारंवार राजकीय हस्तक्षेप केला जातो, यामुळे त्यांचे मनेधैर्य कमी झाले आहे तर गुन्हेगारांचे धाडस मात्र वाढले आहे. काहीही केले तरी आपल्या मागे वाचविणारे आहेत हा त्यांचा विश्वास कमी होईल, त्याचवेळी गुन्हे कमी होतील असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post