* तहसील, पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्ष
* खालापूरकर नागरिकांचे आरोग्य धोक्यात ?
* बिडीओ व विस्तार अधिकारी लक्ष देणार का ?
खालापूर / प्रतिनिधी :- खोपोली शहर व खालापूर तालुक्यात प्लास्टिकने भरलेले कचऱ्याचे ढीग जेथे दिसतील तेथे पेटवून देणे..जेथे खड्डा असेल तेथे गाडून टाकणे..कार्यालय परिसरात बाद झालेली कागदपत्रे पालापाचोळा टाकून पेटवून टाकणे...असे बेकायदेशीर सूत्र तालुक्यातील चोहोबाजूंनी सुरू आहे. कचऱ्याच्या विल्हेवाटीची ही प्रक्रिया तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणारी आहे. पाली फाटा परिसरानंतर आता हाळ ग्रामपंचायत हद्दीत राष्ट्रीय महामार्गांलगत देखील रविवारीच्या सुट्टीच्या दिवशी भर उन्हात प्लास्टिकच्या पिशव्यांनी भरलेला कचऱ्याचा ढीग पेटविण्यात आला होता. घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार कोणताही कचरा, पालापाचोळा जाळण्यासाठी बंदी घातलेली आहे. तरी देखील बिनधास्तपणे तालुक्यात अनेक ग्रामपंचायत हद्दीत सुट्टीच्या दिवशी दिवसा व रात्रीच्या सुमारास कचरा पेटविला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रदूषण विभागासह कर्जत प्रातांधिकारी, खालापूर तहसिलदार, खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, ग्राम विस्तार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे खालापूरकरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.
खालापूर पंचायत समितीपासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर महामार्ग रस्त्यांवर, नदीला लागून कचरा पेटविला जात असताना त्यांच्यावर कोणतीच कार्यवाही केली जात नसेल तर ही मोठी शरमेची बाब आहे. पत्रकारांनी फोन करून माहिती देऊन ही बाब निदर्शनास आणल्यास खालापूरचे ग्राम विस्तार अधिकारी तांडेल यांना पत्रकारांना लेखी टायपिंगमध्ये तक्रार हवी, असे सांगितले. पत्रकारांनी लेखी दिल्यानंतर ग्राम विस्तार अधिकारी कार्यवाही करणार का ? दुसरीकडे गटविकास अधिकारी पत्रकारांचे फोन उचलत नाहीत...फोन न उचलणे...फोनचे उत्तर न देणे... फोन का केला व काय तक्रार आहे, हे सुद्धा जाणून घेण्यास बिडीओ साहेबांना वेळ नाही ? तालुक्यातील ग्रामस्थांच्या डोंगरभर समस्या असताना बेजबाबदार, कामशून्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणाला ग्रामस्थ अक्षरश: वैतागले असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.
हवा प्रदूषित होते म्हणून पर्यावरण कायद्यानुसार हा गुन्हा असून हवा प्रदूषण होते म्हणून पर्यावरण कायद्यानुसार हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार कोणताही कचरा, पालापाचोळा जाळण्यासाठी बंदी घातलेली आहे. कचरा जाळल्याने अनेक विषारी वायू, धूर वातावरणात पसरत असते. यापासून कर्करोग, यकृताचे आजार, मलावरोध, अस्थमा, श्वसनावरोध, मेंदूविकार होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. फोम कप्स, अंड्याचे ट्रे जाळल्याने निघणारा स्टायरिन वायू त्वचा आणि फुफ्फुसांवर वाईट परिणाम करणारा ठरत असतो. कचरा जाळल्यानंतर निघणाऱ्या धुरामुळे संवेदनशील श्वसन यंत्रणेवर विशेषतः लहान मुलांच्या श्वसनावर विपरीत परिणाम होत असतो. त्वचा काळवंडणे, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळणे याचा त्रास होत असतो. डॉक्झिनमुळे गर्भवती महिला, मुले आणि वृद्धांचे आरोग्य खालावू शकते. शक्यतो कोणताही कचरा असेल तर तो जाळला जावू नये याची काळजी प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घ्यायला हवी, असे आवाहन नागरिकांमधून केले जात आहे.
प्लास्टिकचा कचरा असेल तर तो स्थानिक प्रशासनाकडे घंटागाड्यामध्ये द्यावा व इतर पालापाचोळा असलेला कचरा असेल तर तो एक गठ्ठा करून ठेवावे कालांतराने त्याचे आपोआप खत निर्माण होते. असे पाठ नागरिकांना शिकवले जाते, पण चार-चार दिवस घंटागाडी गावात न फिरणे ? आपल्याच कार्यालय परिसरात कागदपत्रे पालापाचोळा टाकून पेटविणे ? तक्रार करणाऱ्या ग्रामस्थाला तासन्तास आपल्या दालनाबाहेर बसविणे ? घंटागाडीतून डम्प करण्यात येणाऱ्या ठिकाणी कचरा कोण पेटवतो ह्याची चौकशी न करणे ? ग्रामस्थांनी व पत्रकारांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांचे फोन न उचलणे तसेच फोन उचलून उडवा-उडवीची उत्तरे देणे हा गुन्हा नाही का ? हा गुन्हा असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करावी व केलेल्या कारवाईची माहिती ग्रामस्थांना देण्यात यावी ? असा संतप्त सवाल खालापूरच्या ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
