* शोभायात्रेत सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी एकत्र
ठाणे / अमित जाधव :- दिव्यात शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहचलेला दिसून आला. शिवजयंतीमुळे दिवा शहर संपूर्ण भगवेमय झालेले दिसून आले. शिवरायांचा 395 वा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात पार पडलेला पहावयास मिळाला असून अनेक ठिकाणी मिरवणूक व पालखी सोहळा काढण्यात आले होते तर किल्ले शिवनेरीवरून येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवज्योत उत्सव मंडळाचे वतीने भव्यदिव्य शोभायात्रा काढून घोडदळ, मावळे असा शिवकालीन पारंपारिक पद्धतीने पोशाख करीत शिवभक्त मोठ्या प्रमाणावर समील झाले होते. तर काही मंडळानी रॅली काढून महाराजांना मानवंदना दिली. भजन, अभंग, भारूड तसेच पोवाडे देखील ठेवण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव मंच, दिवा विकास प्रतिष्ठान व दिवा ग्रामस्थ, दातीवली ग्रामस्थ मंडळ, श्री समर्थ कृपा मित्र मंडळ, जाणता राजा मित्र मंडळ, मराठा वॉरियर्स गडकिल्ले संवर्धक, बेडेकर नगर, स्वराज्य मित्र मंडळ, डॉं. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंच (बेतवडे), सम्यक बुद्ध विहार आदी मंडळांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
दिव्यातील शेकडो शालेय विद्यार्थी, महिला वर्ग सामील होत लेझीम नृत्यात सहभागी झाल्या तर पारंपरिक वेशभूषा करुन ढोल ताश्यांचा गजरात मिरवणूका काढण्यात आल्या. दिवा शहरातील सर्व पक्षीय नेते पदाधिकारी, समाजसेवक कार्यकर्ते मोठया उत्साहात एकत्र पहावयास मिळाले. प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख व माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी लवकरच शिवरायांचा अश्वरूढ पुतळा दिवा चौकात विराजमान होईल असे स्पष्ट केले आहे. तर दिवा शिवसेना उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांनी अनेक उपस्थितत मान्यवरांना शिवरायांची राजमुद्रा भेट स्वरूपात दिली तर पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त दिसून आला.