* धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक सुशोभिकरण व लोकार्पण सोहळा
कर्जत / प्रतिनिधी :- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा इतिहास साक्षी ठेवत, कर्जत-खालापूरमध्ये उभारलेल्या धर्मवीर संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा सुशोभिकरण व लोकार्पण सोहळा शिवजयंतीच्या दिवशी अर्थात १९ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या हस्ते व हभप मारुती महाराज राणे यांच्या उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमप्रसंगी पत्रकार विजय मांडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात आमदार महेंद्र थोरवे यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचे कौतुक केले व आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत-खालापूर भाग्यवान आहे, असे गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमप्रसंगी बोलताना धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी 'शिवतेज मित्र मंडळा'च्या युवकांनी घेतलेल्या पुढाकाराचे आणि त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच आज हे स्मारक प्रत्यक्षात उभे राहू शकले. हे स्मारक संपूर्ण हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिवशी लोकार्पण होत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. धर्मवीर संभाजी महाराजांचे बलिदान आणि त्यांची धर्मनिष्ठा याचा उल्लेख करीत, त्यांच्या कर्तृत्वामुळेच आज आपल्या अंगणात तुळशी वृंदावन आहे, असे ते म्हणाले. युवकांनी आपल्या जीवनाची सुरुवात शिवचरित्र वाचनाने करावी, असा संदेश देत आमदार थोरवे यांनी कर्जतच्या विकासासंबंधी महत्त्वाच्या घोषणाही केल्या. ५७ कोटी रुपयांच्या पाणी योजनेला मंजुरी मिळाल्याची माहिती देत, लवकरच संपूर्ण कर्जत शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रम प्रसंगी माजी उपसभापती मनोहर थोरवे, उद्योजक बाळू तवळे, संजय कडू, सदाशिव बैलमारे, माजी नगरसेवक संकेत भासे, वसंत मोधळे, मारुती बैलमारे, रमाकांत जाधव, नगर परिषद अभियंता मनिष गायकवाड, रामदास बैलमारे, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे, ज्ञानेश्वर कर्णूक, महादेव भुईकोट, ज्ञानेश्वर भालिवडे, अरुण थोरवे, भगवान शिंदे, कृष्णा शिंदे, प्रदीप वायकर, हेमंत ठाणगे, अभिषेक सुर्वे, संदीप कर्णूक, किशोर कदम, वैभव सुरावकर, बाळू निगुडसे, सागर तवळे, दिनेश कडू, शिवाजी श्रीखंडे तसेच शिवतेज मित्र मंडळाचे सदस्य व शेकडों शिवभक्त, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, क्रीडापटू आणि नागरिक उपस्थित होते. हा सोहळा कर्जत-खालापूरच्या जनतेसाठी एक अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण ठरला.
