पालघर जिल्ह्यातील पतसंस्थांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न

वसई / प्रतिनिधी :- पालघर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन वसई व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 13 व 14 फेब्रुवारी रोजी बंगली, वसई येथील लोकसेवा सभागृहात दोन दिवशीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी हे होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक पालघर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष शरद जाधव यांनी केले. तर काकासाहेब कोयटे कुलकर्णी यांचे स्वागत व सन्मान  शरद जाधव, मॅकलस घोन्सालवीस, आल्बर्ट आथाईड  यांनी पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन केला.

तत्कालीन नालासोपारा नगर पालिकेत नगरसेवक व  बांधकाम सभापती, आरोग्य सभापती पदाच्या दहा  वर्षांच्या कालावधीत नागरिकांसाठी केलेल्या बहुमोल व अतुलनीय कामगिरीमुळे तसेच मागील वीस वर्षांपासून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनमध्ये सातत्याने कार्यरत राहून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविल्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने महाराष्ट्र फेडरेशनच्या सहसचिवपदी करीत असलेली निःस्वार्थी सेवा लक्षात घेऊन पालघर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन वसई यांनी शरद जाधव यांचा जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी यांच्या हस्ते जीवनगौरव सन्मानचिन्ह 2025 देवून सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे बसिन कॅथॉलीक को-ऑप, बँक वसई या शेड्युल्ड बँकेत पस्तीस वर्षे सेवा करून महाव्यवस्थापक म्हणून सेवानिवृत्त होऊन आपल्या अनुभवाचा उपयोग सहकारी पतसंस्थांनाही व्हावा या हेतूनेच पालघर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन वसई या संस्थेत गेल्या पंधरा वर्षांपासून सरचिटणीस म्हणून अविरत सेवा देत असलेल्या अल्बर्ट अथाईत यांच्या कार्याची दखल घेऊन फेडरेशनने  काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते अथाईत यांना 'जीवन गौरव सन्मानचिन्ह 2025' देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिरात विविध विषयावर प्रबोधनात्मक मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये माधव प्रभुणे (मुंबई) यांनी ताळेबंद विश्लेषण व पतसंस्था गुंतवणूक निकष, उमेश नार्वेकर (CA) मुंबई यांनी आयकर कायदा 80 (p), 80 p (2) (d) TDS व आर्थिक वर्ष 2024 -2025  साठी तरतुदी यावर मार्गदर्शन केले. कल्पेश वर्तक (CEO), जनसेवा सहकारी बॅंक लि. यांनी पतसंस्थेमधील कर्ज प्रकार, कर्ज मर्यादा व वसुली अत्यावश्यक दस्तावेज याबाबत मार्गदर्शन केले.

गणेश निमकर यांनी NPA बाबत सुधारित निकष, वसुली व्यवस्थापन ग्राहक वर्ग व व्यवसाय वृद्धी, यावर सखोल व उपयुक्त मार्गदर्शन केले. तसेच मेघा जेरे यांनी ताणतणाव व मानसिक संतुलन यावर उत्तम उदाहणासह मार्गदर्शन करून प्रशिक्षण शिबिरात रंगत आणली. शेवटी प्रशिक्षणार्थिना प्रमाणपत्राचे वितरण करून कार्याध्यक्ष मँकलेस घोन्सालवीस यांनी सर्वांचे आभार मानत शिबिराची सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post