बारामती पुन्हा हादरले !

* बॉईज हॉस्टेलमध्ये 15 वर्षीय मुलाची आत्महत्या

बारामती / अक्षय कांबळे :- बारामतीमधील चर्चेस ऑफ ख्राईस्ट बॉईज होममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 15 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे बारामती शहर हादरले आहे.

या बॉईज हॉस्टेलचे अधीक्षक रॉबर्ट गायकवाड यांच्या जाचाला कंटाळून या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. रॉबर्ट गायकवाडला अटक केल्याशिवाय मृतदेहाचे शवविच्छेदन करू देणार नाही, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. 

2016 पासून तब्बल 24 मुले बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राजवीर शिंदे या मुलाचा मृतदेह सापडला. बारामतीतील चर्च ऑफ ख्राईस्ट बॉईज होममधील हा मुलगा निरा डावा कालव्यात बुडाला होता. त्याचा 36 तासांपासून शोध सुरू होता. 2016 पासून 24 मुले बेपत्ता झाल्याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल झाल्या आहेत, तरीही जबाबदार व्यक्तींवर कोणतीही कारवाई झालेली नाही. 

बेवारस आणि अनाथ मुलांच्या संगोपनासाठी बारामतीत चर्च ऑफ ख्राईस्ट बॉईज होम उभारण्यात आले आहे. समाज कल्याण विभाग आणि धर्मदाय आयुक्त यांच्या अखत्यारीत चालणाऱ्या या बॉईज होममध्ये अधीक्षक रॉबर्ट गायकवाड मुलांना त्रास देत असल्याचा आरोप शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. बॉईज होममध्ये शासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा मुलांना दिल्या जात नाहीत, उलट मुलांना वैयक्तिक घरची कामे करायला लावली जातात आणि प्रसंगी मारहाण केली जाते. त्यामुळे अधीक्षकाच्या जाचाला कंटाळून मुले बेपत्ता होत आहेत किंवा कॅनॉलच्या पाण्यात उड्या मारून जीवन संपवत आहेत. अधीक्षकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ट्रस्टचे सदस्य जय काळे यांनी केली आहे. येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन बेपत्ता मुलांबाबत काय झाले, यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी संस्थेकडून पुढाकार घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष दीपक जाधव यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत आपल्याला कोणतीच माहिती दिली जात नसल्याची तक्रार केली आहे. मुले बेपत्ता झाल्यानंतरही अधीक्षकांकडून आपल्याला कळविले जात नाही, असे सांगत अधीक्षक रॉबर्ट गायकवाड हेच जबाबदार असल्याचे अध्यक्षांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post