* साजगाव मंदिर ते ताकई व साजगाव फाटा ते धाकटी पंढरी स्मशानभूमी येथील रस्त्यासंदर्भात करणार बेमुदत साखळी उपोषण
खोपोली / प्रतिनिधी :- साजगाव मंदिर ते ताकई रोडचे काम पूर्ण झालेले आहे. परंतु या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनास लेखी तक्रार देऊन, वारंवार विनंती करुन देखील केवळ प्रशासन आश्वासन देण्यामध्ये मग्न असल्याने संबंधित खड्ड्यामुळे नागरिकांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण होत आहे. याचप्रमाणे साजगाव फाटा ते धाकटी पंढरी स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता वनखात्याच्या परवानगीच्या कात्रीत अडकल्याने या रोडच्या कामाला गती मिळत नाही.
दोन्ही रोडच्या कामासंदर्भात खोपोली-खालापूर संघर्ष समिती सातत्याने पाठपुरावा घेत असून प्रशासन हतबल होत आहे. यामुळे खोपोली-खालापूर संघर्ष समितीच्या माध्यमातून साजगाव ताकई खड्डा दुरुस्तीचे काम न झाल्यास 17 मार्चपासून तर साजगाव फाटा ते धाकटी पंढरी येथील स्मशानभूमी पर्यंतच्या रस्त्याचे काम न झाल्यास 4 एप्रिल 2025 पासून संबंधित प्रशासनाच्या कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार आहे.
खोपोली-खालापूर संघर्ष समितीच्या माध्यमातून शहरातील अनेक विषयांवर आवाज उठवून नागरिकांना न्याय देण्यात यश आलेले आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता या विषयावर समिती पुन्हा एकदा लढा देऊन संबंधित विषय मार्गी लावेल. या आंदोलनात विविध संस्था व नागरिक सहभागी होतील, असे सांगण्यात आले.