कोकण / दिपक कारकर :- गुहागर तालुक्यातील नैसर्गिक सानिध्यात वसलेल्या मौजे आंबेरे खुर्द गावचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री कालकाई पावणाई मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा शुक्रवार, 28 फेब्रुवारी ते 2 मार्च 2025 कालावधीत संपन्न होणार आहे.
शुक्रवार दि. 28 रोजी श्रीमूर्तीची भव्य मिरवणूक, संकल्प गणपती पूजन, पुण्याहवाचन व रात्री 8 वाजता जि. प. पूर्ण प्राथ. मराठी शाळा आंबेरे खुर्द येथील विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम होईल. शनिवार 1 मार्च रोजी स. पर्याय होम व रात्री 9 वाजता श्री दत्त प्रासदिक भजन मंडळ, आंबेरे खुर्द यांचे सुस्वर भजन सादर होणार आहे. तर रविवार, 2 मार्च रोजी सकाळी प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण व पूर्णाहुती, आरती, महाप्रसाद व सायं. 4 वाजता श्री सत्यनारायण महापूजा व रात्री 9 वाजता मान्यवर सत्कार सोहळा व ग्रामस्थांचे बहुरंगी नमन हा मनोरंजनपर कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामदेवता देवस्थानचे सर्व मानकरी, ग्रामस्थ, मुंबईकर आणि महिला मंडळातर्फे करण्यात आले आहे.