* 25 वर्षांच्या यशस्वी शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा!
खोपोली / प्रतिनिधी :- रायगड पोलिस आयोजित रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत बालगंधर्व रंगभवन, रिलायन्स फाउंडेशन नागोठणे येथे ‘सुरक्षित शाळा व स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी’ सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील 500 शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यापैकी 28 शाळांनी शासनाच्या सुरक्षा मानांकनात 90 % पेक्षा अधिक गुण प्राप्त केले. या शाळांमधून वसंत देशमुख मेमोरियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, खोपोली या शाळेची ‘माझी शाळा सुरक्षित शाळा’ म्हणून निवड करण्यात आली.
* 25 गौरवशाली वर्षांचा अभिमान!
वसंत देशमुख मेमोरियल स्कूल या वर्षी आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील 25 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या या शाळेने समाजप्रबोधन आणि सुरक्षिततेसाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करण्यात आले.
या गौरवप्राप्तीबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकवर्गांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे होत्या. यावेळी कोकण परीक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड आदी उपस्थित होते.
रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असताना मिळालेल्या या सन्मानामुळे वसंत देशमुख मेमोरियल स्कूलच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सुरक्षित वातावरणाचा पुनःश्च गौरव झाला आहे. शाळेच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
