ठाणे / अमित जाधव :- संत सेवालाल गोर बंजारा समिती दिवा शहर आयोजित २८६ वी जयंती दिवा शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संपूर्ण दिवा शहरात भव्य रॅली काढण्यात आली. दिवा चौकाजवळील मैदानात संत शिरोमणी सेवालाल महाराज व आई जगदंबा मरीआम्मा माता यांची भोगविधी कार्यक्रम व महाप्रसाद तसेच शालेय विद्यार्थी गुणगौरव सोहळा व नृत्याविष्कार साजरा करण्यात आला. बंजारा समाजाचे अनेक प्रश्न व समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव पाठीशी राहू, असे प्रतिपादन माजी आमदार सुभाष भोईर यांनी केले.
या कार्यक्रमास नगरसेवक दीपक जाधव, दिवा पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल कोळेकर, बालाजी कदम, संभाजी कदम, अनिलशेठ भगत, कुणाल पाटील, व्यापारी संघटनेचे चेतन पाटील, अरुण म्हात्रे, वासू चव्हाण, नामदेव राठोड, वसंत चव्हाण, बाबू राठोड आदी उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष शंकर पवार, कार्याध्यक्ष उमेश राठोड, सचिव तारासिंग पवार, खजिनदार श्याम राठोड यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तसेच संत सेवालाल गोर बंजारा समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.