* वनविभागाची धडक कारवाई
अकोट / मोहम्मद जुनेद :- वनपरिक्षेत्रात मौजे मोहाळा येथील हबीबनगर येथे अवैध सागवान फर्निचर माल तयार करणाऱ्या फर्निचर दुकानावर धाड टाकीत मोठ्या प्रमाणात सागवानची लाकडे जप्त करण्याची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे लाकडांची तस्करी करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.
अकोला वन विभागाला गोपनीय माहिती मिळाली आहे की, अकोट तालुक्यातील मोहाळा येथे हबीबनगरमध्ये एका फर्निचर दुकानात विनापरवाना सागवान लाकडापासून घरगुती फर्निचर बनविण्याचे काम सुरू आहे. या माहितीच्या आधारे अकोला प्रादेशिक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरगुती फर्निचर मार्ट या ठिकाणी धाड टाकली असता, त्या ठिकाणी त्यांना अवैधरित्या सागवान लाकडापासून फर्निचर करताना दिसून आले. या कारवाईमध्ये अकोला वन विभागाने सागवान लाकडाचे कट साईज नग तसेच सागवान फर्निचर बनविण्यासाठी वापरण्यात येणारी सागवान रंदा मशीन जप्त केली आहे. या कारवाईमध्ये वन विभागाने अंदाजे ३० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. वन विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे अवैध सागवानीची तस्करी करून त्यांची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.