‘उसनवारी’चे जगणे

मी, माझ्या मरीन ड्राईव्हच्या कार्यालयात कामात फार मग्न होतो. घड्याळाकडे पाहिले, तर रात्रीचे 11 वाजून गेले होते. काम आवरून मी बाहेर पडलो. नेहमीप्रमाणे मलबार हिलला गगनभाई यांच्या घरी मुक्कामाला जायचे, असे नियोजन केले होते. टॅंक्सीच्या शोधात मी रस्त्याने पुढे निघालो.

थोडे पुढे गेल्यावर, रस्त्याच्या कडेला पोलिसांची एक गाडी थांबलेली दिसली. त्या गाडीतून एक पोलिस बाहेर आला आणि फुटपाथच्या कडेला बसलेल्या, भली मोठी पोत्यांची पट्टी घेऊन बसलेल्या माणसाजवळ गेला.  ते त्या माणसाला म्हणाले, “दे रे बाबा, तंबाखू.”

तंबाखू चोळत पोलिस म्हणाला, “अरे बाबा, तू अजून जिवंत आहेस? हे घरच्यांना सांगितलेस की नाही?” समोरच्या व्यक्तीने चेहऱ्यावर चिंता आणत “नाही,” असे म्हणत मान हलवली.

“जा रे बाबा घरी जा. अजून किती दिवस असाच ओळख लपवून राहशील?” असे म्हणत, तो पोलिस गाडीत बसला आणि ती गाडी पुढे निघून गेली.

मी त्या व्यक्तीजवळ आलो. तो काहीतरी दडपून जगतोय, हे जाणवत होते. बाजूला ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीकडे बोट दाखवत मी त्याला विचारले, “पाणी देता का प्यायला?”

त्या व्यक्तीने क्षणाचा ही विलंब न लावता बाटली माझ्याजवळ आणून दिली. पाणी पिल्यावर मी त्याला म्हणालो, “काका, त्या पोलिसांना बोलताना मी ऐकले. नेमकं काय प्रकरण आहे?”

थोडासा गोंधळलेला तो माणूस म्हणाला, “काही नाही, साहेब. ते माझ्या ओळखीचे आहेत, म्हणून सहज बोलत होते.”

मी ज्या व्यक्तीशी बोलत होतो, त्या व्यक्तीचा पत्ता, तो किती दिवस तिथे आहे, त्याला किती पगार मिळतो याबद्दल माझे विचारणे झाले. मी माझी बॅग त्या पोत्यांच्या पट्टीवर ठेवून त्याच्याजवळ बसलो. एक ते दीड तास झाल्यानंतर त्या व्यक्तीने त्याचे मागचे आयुष्य सांगितले, ते भयानकच होते. सगळे विसरून आता तो व्यक्ती मुंबईमध्ये आनंदाने दिवस काढतोय, पण तरीही त्याच्या मनावर काळजीचा मोठा ताण आहे, हे स्पष्ट दिसत होते.

मी ज्या व्यक्तीशी बोलत होतो, त्यांचे नाव विनोदकुमार मिश्रा. मिश्रा हे बिहारमधील वैशाली या प्राचीन शहरात राहायचे. त्यांनी सायकल रिक्षा चालवून तीन मुलं आणि दोन मुली शिकवल्या, त्यांची लग्न लावली आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. वय वर्ष साठ होऊन गेले तरी मिश्रा यांचे रिक्षा चालविण्याचे काम सुरूच होते.

एका दिवशी मिश्रा यांच्या रिक्षाला शाळेच्या बसचा अपघात झाला आणि त्यांचा रिक्षा मोठ्या नाल्यात पडला. मिश्रांना बाहेर काढतानाही त्यांच्या दोन्ही पायांना मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली. यानंतर घरात मुलं आणि सुना यांच्यात वडिलांचे जबाबदारीवरून सतत भांडणं सुरू झाली. शेवटी, भांडणं टोकाला गेल्यामुळे मुलांनी वेगवेगळं राहण्याचा निर्णय घेतला. आयुष्यभर ज्या मुलांसाठी कष्ट केले, त्यांचं हे वागणं मिश्रांना सहन होत नव्हतं.

अपघातानंतर मिश्रा घरीच पडून होते. हळूहळू त्यांची प्रकृती सुधारली. त्याच दरम्यान, कोरोनाचा कहर सुरू झाला. मिश्रा आणि त्यांची मुलगी कावेरी दोघेही सरकारी दवाखान्यात भरती झाले. त्याच काळात एकदम कडक लॉकडाऊन लागला. अनेक दिवस कुणाचा कुणाला पत्ता नव्हता. दवाखान्यात माणसं मेल्यावर मृतदेह घेऊन जाण्यासाठीही कुणी येत नव्हतं.

मिश्रा आणि त्यांची मुलगी कावेरी ज्या सरकारी दवाखान्यात भरती होते, तिथे अनेक माणसे मृत घोषित झाली होती. मिश्रा म्हणाले, “जिल्हा रुग्णालयात सुमारे साडेचारशे माणसे होती. त्यातील बहुतांशी सर्वांनाच डॉक्टरांनी मृत घोषित केले. माझ्या घरच्यांना वाटले की, त्या सर्व मृतांमध्ये मी आणि माझी मुलगीही होतो.”

“एक दिवस असा आला की, एकही डॉक्टर दवाखान्यात येत नव्हता. सरकारी माणसे रिकाम्या वाहनांनी येत आणि तिथल्या मृतदेहांना उचलून नेत असत. माझी मुलगी कावेरी तीन दिवस एका कोपऱ्यात पडून होती. तिच्या निर्जीव शरीराजवळ जाण्याची मला हिंमत होत नव्हती. पण शेवटी मी तिच्या पायांवर डोके ठेवून मोठ्याने रडू लागलो. रडून रडून किती रडणार? मृतदेह पाहून डोळे सुकून गेले होते, तर घाण वासाने नाकाची जळजळ होत होती. ज्यांच्यात जीव होता, तेही तिथले भीषण दृश्य पाहून आपला प्राण सोडत होते.”

“जिकडे पाहावे तिकडे फक्त मृतदेहच. माझ्या मुलीच्या मृत्यूची बातमी घरच्यांना मिळाली, पण मी जिवंत आहे की नाही हे पाहण्यासाठी कुणीच आले नाही. शेवटी मी त्या दवाखान्यातून बाहेर पडलो. घरी आता कोणीच नव्हते. लहान मुलगी, जी मला कधीमधी दिसायची, तीही आता या जगात नव्हती. डोक्यात सतत आत्महत्येचे विचार येत होते. पण का मरायचे, याचे उत्तर सापडत नव्हते.”

“एका औषधाच्या मालवाहू वाहनाने मी वैशाली शहराजवळील भगवानपूर या छोट्या शहरात पोहोचलो. माझी ओळख कुणालाही न सांगता, एका मंदिरात तीन महिने राहिलो. या काळात मी माझ्या मुलांचा शोध घेतला. ते कुठे आहेत आणि काय करतात, याची माहिती घेतली. जेव्हा मला त्यांच्या स्थितीबद्दल कळाले, तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला.

माझी तिन्ही मुले पुन्हा एकत्र आली होती. वडिलांनी आयुष्यभर जे शिकवले होते, ते आपण विसरलो होतो, याची त्यांना जाणीव झाली होती. वडिलांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सर्व भावंडे पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मिश्रांचे संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते. ही बातमी ऐकताच, मिश्रा खूप भावूक झाले.

‘चला, आपण जिवंत असल्याचे मुलांना सांगून त्यांना सुखद धक्का द्यावा,’ या भावनेने मिश्रा आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत होते. घरी जाण्यासाठी ते निघणार इतक्यात त्यांच्या मनात एक विचार आला. ‘मी नाही, माझा त्रास नाही, म्हणून माझ्या मुलांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. जर मी पुन्हा घरी गेलो, तर ते पुन्हा विभक्त होतील,’ हा विचार त्यांना सतावत होता. दोन-तीन दिवस त्यांनी हा विचार मनात फिरवत ठेवला.

आखेर त्यांनी मुलांकडे न जाण्याचा निर्णय घेतला आणि मंदिरातच राहायचे ठरवले. तीन-चार दिवसांनी त्यांना त्यांच्या ओळखीचा एक माणूस दिसला. त्याला पाहून त्यांचा विचार अधिक ठाम झाला—‘जर मी इथे राहिलो, तर माझ्या जिवंत असल्याची बातमी कधी ना कधी मुलांना कळेल, आणि ते पुन्हा विभक्त होतील.’ या विचाराने त्यांनी त्या ठिकाणाहून निघण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई गाठली.”

माझ्याशी बोलताना मिश्रा यांचे डोळे कित्येक वेळा भरून येत होते. त्यांना त्यांच्या नातवाची आणि छोट्या मुलांची आठवण होत होती. मी मिश्रा यांना विचारले, “तुम्ही या वयात मुंबईत काम कसे मिळवले?”

मिश्रा म्हणाले, “काही नाही, साहेब. सुरुवातीचे तीन दिवस स्टेटस हॉटेलच्या बाहेर बसून भीक मागून खात होतो. आमच्या बिल्डिंगमधले वजीर साहेब म्हणाले, ‘अरे, भीक मागून का खातोस? चल, तुला छान काम देतो.’ तेव्हापासून मी इथे कामाला आहे.”

आमचे बोलणे सुरू असताना बाजूला झोपलेला एक व्यक्ती उठून म्हणाला, “अहो आजोबा, जर कधी इथेच मेला तर तुमचे काय होईल? कोण करील तुमचे अंत्यसंस्कार? तुमच्या घरच्यांना कोण सांगेल?”

तेव्हा मिश्रा अगदी शांतपणे म्हणाले, “त्यांच्यासाठी तर मी केव्हाच मेलो आहे.”

साडेअकरा वाजेपर्यंत फुटपाथवर त्या मोठ्या पोत्यांच्या पट्टीवर आम्ही दोघेच होतो. मागच्या चार तासांत तिथे सहा जण झोपून गेले होते. कुणाला आमदार निवासात जागा मिळाली नव्हती, कुणाला हॉटेल परवडत नव्हते, तर कुणी सकाळच्या गाडीने जाणार होते. काही जण सकाळच्या ड्युटीवर जाणारे कामगार होते.

मिश्रा म्हणाले, “ही गर्दी इथे रोजच असते. सुरुवातीच्या काळात मलाही मुंबईत रात्री झोपण्यासाठी खूप त्रास झाला. माझ्यासारखा हा त्रास इतरांना होऊ नये, म्हणून मी मालकाला विनंती केली होती की गरजू लोकांना थोडी मदत करु द्या. मालक म्हणाले, ‘करा, पण गेटच्या बाहेर करा.’ काय बंगला आणि काय फुटपाथ, सर्वांचे सारखेच असते – वर आकाश आणि खाली जमीन. जमिनीवर झोपलो ना की, अहंकार नाहीसा होतो.” मिश्रा यांचे हे बोलणे ऐकून मी म्हणालो, “आज मीही इथेच झोपतो. पाहू, झोप लागते का!” मी बसलेला लांब झालो आणि मिश्रा मला म्हणत होते, “नका, साहेब! इथे मच्छर आहेत.” पण मी ऐकत नाही हे लक्षात आल्यावर ते धावत त्यांच्या रुममध्ये गेले. त्यांनी कपड्यांनी भरलेली एक पिशवी आणली आणि ती माझ्या डोक्याखाली ठेवली.

मी त्या क्षणी विचार करत होतो, “काय माणसे असतात ना! फुटपाथवर झोपतात, पण त्यांचे मन मात्र आभाळाएवढे असते.” असे विचार करता करता मला कधी झोप लागली ते कळालेच नाही.

सकाळी उठून पाहतो तर काय, मी एकटाच तिथे झोपलो होतो. बाजूला मिश्रा झाडांना पाणी टाकत होते. त्यांनी दूरूनच मला “शुभ सकाळ” म्हणत निरोप दिला आणि पुन्हा आपल्या कामात मग्न झाले.

मी माझ्या ऑफिसकडे निघालो. माझ्या मनात विचार येत होता—काही माणसे आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी किती संवेदनशील असतात! ते आपले आयुष्य उसनवारी करून इतरांचा विचार करतात. आपला जन्म कुणाला काहीतरी देण्यासाठी झाला आहे, याची प्रचिती त्यांच्या वागण्यातूनच दिसते. बरोबर ना? तुमचेही तसे आहे का.? 

Post a Comment

Previous Post Next Post