पुणे / अक्षय कांबळे :- अहिल्यानगरमध्ये झालेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांनी अप्रतिम कामगिरी करीत ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा पटकावली. हा क्षण केवळ त्यांच्यासाठीच नाही, तर महाराष्ट्राच्या क्रीडा प्रेमींकरिता अभिमानाचा आहे. पृथ्वीराज यांनी मेहनत, समर्पण आणि धैर्याच्या जोरावर हे यश संपादन केले असून पृथ्वीराज मोहोळ ने प्रभावी खेळ करीत महेंद्र गायकवाड यांचा पराभव केला आणि 67 वा महाराष्ट्र केसरी किताब पटकाविला
पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्यानंतर त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते चांदीची गदा आणि थार गाडी देण्यात आली. पृथ्वीराज मोहोळने महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी मोठा जल्लोष केला.
* शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारली?
अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मोठा गोंधळ झाल्याचे पहायला मिळाले. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ झाल्यामुळे स्पर्धेला गालबोट लागले. उपांत्य फेरीचा सामन्यात पैलवान शिवराज राक्षेचा पराभव झाल्याचा निर्णय पंचांनी दिला. मात्र, पैलवान शिवराज राक्षेने पंचांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात नाराजी व्यक्त करीत पंचाला लाथ मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात उपांत्य फेरीचा कुस्तीचा सामना रंगला होता. मात्र, पैलवान पृथ्वीराज मोहोळकडून शिवराज राक्षे पराभूत झाला. पण पराभूत होताच शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मैदानात काहीवेळ गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद काहीसा निवळला. हा गोंधळ झाल्यानंतर शिवराज राक्षेने या सामन्याचा रिव्ह्यू घेण्याची मागणी केली होती.
