कर्जत / जयेश जाधव :- कर्जत चार फाट्यावरील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यातून वाहन चालकांना वाहने चालवितांना त्रासाला सामोरे जावे लागते. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. तरी या रस्त्यांवर खड्डे लवकरात लवकर भरावेत अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा मनसे स्टाईलने सत्कार केला जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण (मनसे) सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिला आहे.
कर्जत चारफाटा रस्त्यावरील कर्जत - मुरबाड, कर्जत - कल्याण, कर्जत - चौक, कर्जत रेल्वे स्टेशनकडे या रस्त्यांवर जाणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर आहे. येथून जाणाऱ्या कर्जत चारफाट्यावर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना या रस्त्यावर चालणे मुश्किल झाले आहे , तर या खड्ड्यात वाहने चालवितांना त्रास सहन करावा लागत आहे. कर्जत चारफाटा ते चौक या राज्यमार्गांवर अनेक ठिकाणी अर्धवट व संथगतीने रस्त्याची कामे सुरू आहेत. याशिवाय अर्धवट रस्त्यावरील धुळ सर्वत्र उडून नागरिकांना विविध श्वसनाचे आजार जडत आहेत. याशिवाय या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. जर या रस्त्यांवरील खड्डे ठेकेदारांकडून येत्या आठ दिवसांत भरले नाही तर मनसे स्टाईलने अधिकाऱ्यांचा सत्कार केला जाईल, असा इशारा मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी कर्जत सा .बांधकाम विभागाला दिला आहे.

