* छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणजे हिंदवी स्वराज्याचा सन्मान आणि आपला अभिमान - आ. थोरवे
कर्जत / विलास श्रीखंडे :- संपूर्ण हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या भव्य अनावरण सोहळा शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पाषाणे या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि शिवप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागात संपन्न झाला.
या सोहळ्यास रोजगार हमी मंत्री ना. भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे प्रमुख उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना ना. भरतशेठ गोगावले यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत पुसले जाऊ शकत नाही. त्यांनी उभारलेले स्वराज्य आणि त्यांच्या पराक्रमाचा इतिहास अजरामर आहे. आज आपण सर्व जण त्यांच्या स्मारकासमोर उभे आहोत ही मोठी गौरवाची बाब आहे. पाषाण गावाने हे भव्य स्मारक उभारून शिवप्रेमाचा अभूतपूर्व आदर्श निर्माण केला आहे. याला मी मनःपूर्वक वंदन करतो.
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यासाठी महान कार्य केले आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन आपण पुढे जावे असे सांगितले. कोकणासाठी सर्वाधिक निधी देण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे कोकणाच्या विकासाला गती मिळाली आहे. जन्म झाल्यावर जशी पंढरीची वारी करावी, तसे प्रत्येकाने एकदा तरी रायगड पाहायला हवा. रायगड पाहिल्याशिवाय शिवरायांचे कार्य पूर्णपणे समजणार नाही.
पाषाण गावातील भवानी माता मंदिर, छत्रपती शिव शंभू मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ही आपल्या ऐतिहासिक वारस्याची साक्ष देतात. ही ठिकाणे भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरतील याची इतिहासात नोंद घेतली जाईल असे वक्तव्य आमदार महेंद्र थोरवे यांनी केले. तर, शिवचरित्र वाचल्याशिवाय यशाचा मार्ग सापडणार नाही. त्यासाठी आजच्या तरुणांनी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांच्या विचारांवर चालत समाजासाठी योगदान दिले पाहिजे. यावेळी त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक करत सांगितले की, माझा शिवसेनेचा कार्यकर्ता राहुल विशे यांनी आतापर्यंत सभापती म्हणून जबाबदारी निभावली आहे. पुढील काळात त्यांना जिल्हा परिषदेच्या सदस्य पदी निवडून देण्याचे आवाहन मी सर्वांना करतो.
या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी मंत्री ना.भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना सहसचिव एकनाथ शेलार, दीपक कथोरे, शिवराम बदे, माजी सभापती राहुल विशे, उत्तम शेळके, भरत डोंगरे, प्रशांत झांजे, भरत हाबळे, रामचंद बदे, भानुदास राणे, दशरथ ऐनकर, रवी फोपे, संतोष भुंडेरे, गणेश शेळके तसेच पाषाणे ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

