ठाणे / अमित जाधव :- दिवा शहरातील आदर्श विद्यालयात आज दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेच्या संचालक अमित मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारत देशाची महासत्तेकडे वाटचाल सुरू असून विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार व्हावेत हाच उद्देश लक्षात घेऊन या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रगत होत असलेल्या विज्ञानाची कास धरून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रयोग सादर करावे व या प्रयोगातून एखादा शास्त्रज्ञ बनावा यासाठी हे लहान मुलांचे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रयोगातून मुले मोठी व्हावीत अशी अपेक्षा यावेळी पालक व मान्यवरांनी व्यक्त केली.
याप्रसंगी आदर्श शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या प्रकारे हरित ऊर्जा, ओला कचरा, सुका कचरा, जलशुद्धीकरण, अन्न व स्वच्छता, आरोग्य, सांडपाणी व्यवस्थापन आदी विविध विषयावर तंत्रज्ञान वापरून प्रयोगाचे सादरीकरण उत्स्फूर्तपणे दाखवून दिले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शाळेचे संचालक अमित मिश्रा तसेच मुख्याध्यापक अलोक राय तसेच संबंधित शिक्षकांनी मदत केली असून हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचे अनेक पालकवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते तर शिक्षकांनी अनेक विद्यार्थ्यांच्या प्रयोगाची पाहणी करीत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.