मन हो चंगा तो कठोती में गंगा..!

* संत रोहिदास महाराजांच्या संदेशाचा आला प्रत्यक्ष प्रत्यय

खालापूर / सुधीर देशमुख :- सध्याचे राजकारण नेतेमंडळींनी आणि त्यांच्या पक्ष संघटनांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिकांमुळे इतके ताणले गेले आहे की, काही नेत्यात पराकोटीचा दुरावा निर्माण झालेला दिसून येतो. नेत्यांकडूनच नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनही एकमेकांविरोधात सातत्याने टीकास्त्र सोडले जात असल्याने भविष्यात कधीच संबंध सुधारणार नाहीत असेच अंदाज आणि आडाखे समाज माध्यमावर बांधले जात असतात. एका अर्थाने या नेत्यांमध्ये जणू विळ्याभोपळ्याचे नाते निर्माण झाल्याचा भास निर्माण होतो. प्रत्येकाच्या मनात जे घडूच शकत नाही असा जो भ्रमाचा भोपळा निर्माण झालेला असतो तो पटकन फुटतो किंबहून काळाच्या ओघात जे अशक्य ते शक्य होऊन जाते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खालापूर शहरात संत रोहिदास महाराज जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका समारंभात विद्यमान आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि त्यांच्या विरोधात निवडणूक लढलेले त्यांचे कट्टर विरोधक सुधाकर घारे यांची एकाच व्यासपीठावर असलेली उपस्थिती.

समाजात एकोपा राहण्यासाठी संत महंतांनी आपल्या  आयुष्याची आहुती दिली आहे, किंबहुना त्यांच्यामुळेच समाजामधले संतुलन अबाधीत राहिले आहे. "मन हो चंगा तो कठोती में गंगा" असा दिव्य संदेश जगाला देणाऱ्या संत शिरोमणी रोहिदास यांच्या जयंतीच्या निमित्ताने कर्जत-खालापूरचे विद्यमान आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि धडाडीचे नेते सुधाकर घारे यांचे एकत्र येणे कर्जत-खालापूर तालुक्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक स्वरूपाचे असणार आहे, असा अंदाज व्यक्त करणे अतिशयोक्ती ठरणार नाही नव्हे तर तसेच घडावे अशी मनोमन इच्छा व्यक्त करावीशी वाटते. 

संत रोहिदास महाराज जयंतीच्या निमित्ताने जेष्ठ पत्रकार बाबू पोटे यांनी अपूर्व योग घडवित फक्त आमदार महेंद्रशेठ थोरवे, राजकीय नेते सुधाकर घारे यांनाच एकत्र आणले नाही तर शेतकरी कामगार पक्षाचे नेते संतोष जंगम, किशोर पाटील, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांना देखील सोबत आणले हे विशेष. या निमित्ताने राजकारण आणि समाजकारणातील एका सुवर्ण पर्वाची नव्याने सुरवात झाली असे म्हणणे योग्य होईल.


Post a Comment

Previous Post Next Post