मुजोर आणि उलट्या काळजाच्या सावकाराचा प्रचंड उच्छाद…!

*...आणि वैतागलेल्या कृष्णा काळेने केली आत्महत्या…!

अ. नगर / प्रतिनिधी :- अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात नुकताच एक गुन्हा दाखल करण्यात आला असून बेकायदा सावकाराच्या सातत्याने सुरु असलेल्या तगाद्यांना वैतागून एकाने आत्महत्या केली आहे. सावकाराने आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे कृष्णा श्रीनाथ काळे (रा. शिवाजीनगर, केडगाव, अहिल्यानगर) या कर्जबाजारी झालेल्या इसमाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सुनील राजेश कुऱ्हाडे (रा. शिवाजीनगर, केडगाव, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोतवाली पोलिसांना देण्यात आलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, मयत कृष्णा काळेला शरद जाधव आणि त्याच्या मित्राने आत्महत्या करायला प्रवृत्त केले आहे. मयत काळे याने जाधव यांच्याकडून तीस हजार रुपये हातउसने घेतले होते. मात्र, जाधव हा मयत काळे याला व्याजासह पन्नास हजार रुपये मागत होता. 50 हजार रुपये दिले तरच तुझा ट्रॅक्टर देईल, असे जाधव म्हणत असल्याचै फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

काळे हा तीस हजार रुपये घेऊन जाधव याच्याकडे गेला असता जाधव याने पूर्ण पैसे दे आणि ते तुला जमत नसेल तर रेल्वेखाली उडी टाकून आत्महत्या कर, असे जाधव आणि त्याच्या मित्राने मयत काळेला अपमानास्पद स्वरूपात बोलले. दरम्यान, या बोलण्याचा याचा राग अनावर झाल्याने कृष्णा काळे याने भरधाव वेगात आलेल्या रेल्वेखाली उडी टाकून जीवनयात्रा संपविली.

वास्तविक पाहता सावकारीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवण्याचे काम तालुका उपनिबंधक कार्यालयातल्या अधिकाऱ्यांचे असते. मात्र सावकारी करणाऱ्या अशा लोकांवर नियंत्रण ठेवण्यात अहिल्यानगर तालुक्याचे तालूका उपनिबंधक आणि त्यांचे सहकारी सपशेल अपयशी ठरले आहेत. या कार्यालयाने सावधगिरी बाळगली असती तर कृष्णा काळे याच्यावर आत्महत्येची वेळ आली नसती. दरम्यान, कृष्णा काळेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या शरद जाधव आणि त्याच्या मित्राला या आत्महत्येस जबाबदार धरत या दोघांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केडगावच्या मुजोर आणि उलट्या काळजाच्या सावकाराने प्रचंड उच्छाद मांडल्यानेच ही दुर्दैवी वेळ आली असल्यास या फिर्यादीवरुन स्पष्ट होत आहे. ज्या तालुका उपनिबंधक कार्यालयातल्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे ही दुर्दैवी घटना घडली, त्या तालुका उपनिबंधक कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना देखील सहआरोपी करा, अशी मागणी संतप्त नागरिकांमधून केली जात आहे.


Post a Comment

Previous Post Next Post