नगरच्या फौजदाराची लोणावळ्याजवळ आत्महत्या

* टायगर पॉइंट येथे सापडला मृतदेह, कारण अस्पष्ट...

* पुणे पोलिस दल खडकी ठाण्यात होते कार्यरत

लोणावळा / प्रतिनिधी :- पुणे पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अण्णा बादशहा गुंजाळ (रा. खंडगाव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर)  असे आत्महत्या केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून अण्णा गुंजाळ हे बेपत्ता होते. त्यांचा फोन देखील लागत नव्हता. आज खडकी पोलिस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात येणार होती, त्यापूर्वी अण्णा गुंजाळ यांनी गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना 112 या आपत्कालीन संपर्क क्रमांकावर फोन आला होता. त्यानुसार शिवलिंग पॉइंटजवळ एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहिले असता आत्महत्या केलेल्या ठिकाणाजवळ एक कार (एमएच 17 सीएम 9697) उभी होती. गाडी मालकाची माहिती घेतली असता मालकाचे नाव अण्णा बादशहा गुंजाळ असल्याचे समजले.

त्या गावच्या पोलिस पाटलांशी संपर्क साधल्यानंतर ही गाडी अण्णा गुंजाळ यांचीच असून ते खडकी पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी खडकी पोलिस ठाण्याशी संपर्क केला असता, गुंजाळ हे तिथे पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत व ते तीन दिवसांपासून गैरहजर होते आणि त्यांचा फोन लागत नव्हता. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, गुंजाळ यांना मानसिक तणाव होता का ? किंवा त्यांना कुणी त्रास दिला का ? याचाही तपास करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

लोणावळ्यातील टायगर पॉईंट येथील शिवलिंग पॉईंट या ठिकाणी त्यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. अण्णा गुंजाळ यांनी नेमकी आत्महत्या का केली आहे, हे अस्पष्ट आहे. या घटनेचा अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करीत आहेत. खडकी पोलिस ठाण्यात अण्णा गुंजाळ हे कार्यरत होते.


Post a Comment

Previous Post Next Post