खोपोलीला पुस्तकांचे गाव म्हणून घोषित करणार !

* मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

* हास्य क्लबच्या योगदानानेच आपण आमदार झालो 

* कर्जत-खालापूरचे आ. महेंद्र थोरवे यांचे प्रतिपादन 

* बु'ज हास्य परिवाराचा 22 वा वर्धापन दिन साजरा

* मा. नगराध्यक्ष स्व. साखरेंना मरणोत्तर जीवनगौरव 

खोपोली / मानसी कांबळे :- बु'ज हास्य परिवार 22 वा वर्धापन दिन व पुरस्कार रजनी सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे पुरस्कार रजनीसह उत्साहाने साजरा झाला. नृत्य, संगीत, योग आणि वार्षिक पुरस्कार अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असलेला हा सोहळा आज शनिवार, 8 फेब्रुवारी 2025 सायंकाळी लायन्स सर्व्हिस सेंटर, खोपोली येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र थोरवे हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. बु'ज क्लबच्या विविध कार्यक्रमांच्या प्रात्यक्षिकांच्या व उपक्रमांच्या चित्रफीती सादर करण्यात आल्या. उपस्थित मान्यवरांना बु'ज हास्य क्लबचे संस्थापक व सर्वेसर्वा बाबुलाल ओसवाल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ह.भ.प. रामदास महाराज यांच्या 'माझी वारी' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मंत्र्यांनी व मान्यवरांनी दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. जनता विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी गणेश वंदना सादर केली. भरतनाट्यमद्वारे नटराज व छत्रपती शिवरायांना वंदना सादर करण्यात आली. 'जहां डाल डाल पर सोने की चिडियां करती है बसेरा' हे देशभक्तिपर गीत नृत्य व नाट्यविष्कार उपस्थितांची दाद मिळवून गेले.

महाराष्ट्राचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी हास्य क्लबची आवश्यकता राजकारण्यांना असल्याचे सांगितले. हास्य क्लबसारखे असे उपक्रम राज्यभर होण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली. मुंबईला लाजवतील असे कार्यक्रम खोपोलीत होतात असे कौतुकपर उद्गार त्यांनी काढले. खोपोलीला पुस्तकांचे गाव म्हणून घोषित करण्याबाबत येत्या पंधरा दिवसांत शासनादेश काढण्याचे व त्यासाठी प्रत्येकी 1 हजार पुस्तके असलेली 35 घरे निवडण्याचे त्यांनी घोषित केले. महाराष्ट्रातून एकही प्रकल्प जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. गाजत असलेला जिल्हा म्हणून रायगडचा उल्लेख करुन आ. महेंद्र थोरवे यांना उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ताकद देण्याचे अभिवचन त्यांनी दिले.

आ. महेंद्र थोरवे यांनी राजकारण्यांना आदर्श घालून देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करणारे बु'ज हास्य क्लबचे सर्वेसर्वा बाबुशेठ ओसवाल यांचे त्यांनी कौतुक केले. धर्म व संस्कृती जागविणारे कार्यक्रम आयोजित करण्याचेही कौतुक केले. बु'ज हास्य क्लबचे निमंत्रण ना. उदय सामंत यांनी स्विकारले याची पार्श्वभूमी़ त्यांनी कथन केली. बु'ज हास्य क्लबच्या कार्यक्रमांना उपस्थित राहताना राजकारण सोडून क्लबच्या कार्याला वाहून घेण्याचा मोह होतो असेही आ. महेंद्र थोरवे यांनी सांगितले. हास्य क्लब खोपोलीच्या योगदानानेच आपण आमदार झालो असे स्पष्ट करुन काम करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. साखरे परिवाराचेही त्यांनी कौतुक केले. हास्य क्लबची वास्तू उभारण्यासाठी जास्तीत जास्त योगदान देण्याचे अभिवचन देऊन क्लबला शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यात खोपोली श्री समीर साठे, मराठी उद्योजक अविनाश किरवे, उद्योजक प्रशांत गुरव, समाजसेवक नरेंद्र हर्डीकर, दानशूर जनसेवक नंदुशेठ ओसवाल, पत्रकार दिनकर भुजबळ, खोपोली पद्मश्री महेश निमणे, पेटंट किंग शास्त्रज्ञ उद्योजक धर्मराज पाटील, खोपोली पद्मविभूषण आसावरी दंडवते, उद्योजिका नीता सुनील गुप्ता या  गुणवंतांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. उद्योजक अमित खिसमतराव यांचा देखील सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात खोपोलीतील बटाटेवडा जगप्रसिद्ध करणारे माजी नगराध्यक्ष स्व. बळीरामशेठ (अण्णासाहेब) साखरे यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार उदय साखरे यांनी सपरिवार स्विकारला. हास्य क्लबचे अध्यक्ष कुलवंत सिंग यांचेही याप्रसंगी भाषण झाले. आभार विजय घोसाळकर यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post