प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व प्रथम हप्ता वितरीत

रायगड / प्रतिनिधी :- महाआवास अभियान २०२४- २५ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा-२ योजनेतील २० लक्ष लाभार्थ्यांना मंजुरी पत्र तसेच १० लक्ष लाभार्थी यांना लाभाच्या पहिल्या हप्त्याचे वितरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राज्यस्तरीय कार्यक्रमात करण्यात आले. तर रायगड जिल्ह्यातील लाभार्थ्यांना जिल्हास्तरीय कार्यक्रमात लाभाचे वाटप नियोजन उपायुक्त प्रमोद केंभावी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे यांच्याहस्ते करण्यात आले. 

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित या कार्यक्रमास प्रकल्प संचालक, प्रियदर्शनी मोरे, जिल्हा परिषद सामान्य प्रशासन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, राजेंद्र भालेराव, जिल्हा माहिती अधिकारी, मनिषा पिंगळे, निलेश लांडगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तर तसेच ग्रामपंचायत स्तरावर लाभ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकूण ८ हजार १०३ लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले. दरम्यान, रायगड जिल्ह्यात १५ हजार ५६० लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आलेली आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेने घ्यावा, असे आवाहन प्रमोद केंभावी यांनी‌ यावेळी केले.

घरकुल योजनेतील लाभार्थ्यांनी या योजनेच्या व्यतिरिक्त मनरेगा व शौचालय योजनेचा लाभ घ्यावा. अन्न‌, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपैकी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून निवारा ही मूलभूत गरज पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी दिली. 

रायगड जिल्ह्यातील घरकुलांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी प्रास्तविकात व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post