* नागरिकांना पेट्रोल पंपावर मोफत मिळत असणाऱ्या सुविधाबाबत तहसील प्रशासन उदासिन
खोपोली / प्रतिनिधी :- खालापूर तालुक्यात दिवसेंदिवस सरकारी तसेच खासगी डिझेल, पेट्रोल, सीएनजी गॅस पंपाचे जाळे पसरत असून पंपामध्ये कमालीची वाढ होतांना दिसून येत आहे. दररोज हजारों वाहनधारक डिझेल, पेट्रोल, सीएनजी गॅस भरण्यासाठी पंपात येत असतात. मात्र, नागरिकांना पंपावर मोफत मिळणाऱ्या सुविधांचा लाभ मिळतो का ? असा प्रश्न केल्यास नागरिकांमधून 'नाही' असे उत्तर मिळत आहे. अनेक वेळा आपण जाहिरातींमध्ये पाहत असतो 'जागो ग्राहक जागो' परंतु आपण अनेक वेळा ग्राहक आपल्याच होत असणाऱ्या फसवणुकीकडे डोळेझाक करीत असतो, असे दिसून येते. अनेक वेळा पेट्रोल पंपावर वाहन चालक जातो, रांगेमध्ये थांबून पेट्रोल भरतो व पैसे देऊन निघून जातो. पण पेट्रोल पंपावर वाहनात इंधन भरणाऱ्या ग्राहकांना काही हक्क व अधिकार आहेत. त्याबरोबर ग्राहकांना काही विशेष सेवा देणे पेट्रोल पंप चालकावर बंधनकारक असून त्या सेवा देण्यात पंप चालक दुर्लक्ष करतांना दिसून येत आहेत.
खोपोली शहर, शिळफाटा, हाळ बुद्रुक, खालापूर फाट्यासह अनेक पंपात पुरुष व स्त्रींसाठी बनविण्यात आलेल्या शौचालयाला पंपावर कुलूप लावले जात असल्याचे चित्र दिसून येते. तसेच अनेक पंपात शौचालय नाही...शौचालय आहेत, पण मोडकेतोडके आहेत...शौचालयात पाणी नाही...प्रचंड दुर्गंधी...घाणीने भरलेले...अस्वच्छ असलेले शौचालय असतांना त्यावर प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
ग्राहकांना पेट्रोल पंपावर मोफत शौचालय...पिण्याचे स्वच्छ, शुध्द पाणी...वाहनांत मोफत हवा...इंधनाच्या गुणवत्तेची चाचणी...प्राथमिक उपचार किट..आपात्कालीन फोन कॉल...बिल यासारख्या मोफत सुविधा मिळणे अपेक्षित असतात. मात्र, अशा सगळ्या सुविधांचा लाभ नागरिकांना पेट्रोल पंपावर का मिळत नाही ? हा संशोधनाचा विषय झाला आहे. वाहनात मोफत हवा भरण्यासाठी वाहन धारकांना मशीन खराब झाली आहे...हवा भरण्यासाठी कर्मचारी नाही...पाण्याचा कुलर बंद आहे, पाणी नाही...कर्मचारी बिना आयडी कार्ड... विना सेफ्टी शूज...विना ड्रेस... कानाला फोन लावून पेट्रोल भरतो... मीटर बॉक्समध्ये डेन्सिटी रिडींग चार दिवस उलटून ही बदलत नाही...माहिती विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. तक्रार रजिस्टर विचारल्यास मॅनेजरला माहित आहे, असे सांगितले जाते. तसेच बहुतेक पंपावर परप्रांतीय कर्मचारी कामावर ठेऊन मनमानी पध्दतीने कामे केली जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. प्रशासन या गंभीर समस्येकडे लक्ष का देत नाही ? या मोफत सुविधा नागरिकांना का मिळत नाही ? ऑडिटच्या वेळी या सर्व सुविधा ऍक्टिव्ह केल्या जातात, त्यानंतर या सुविधांपासून नागरिकांना वंचित का ठेवले जाते, याची सखोल चौकशी प्रशासकीय अधिकारी करणार का ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
• पेट्रोल पंपावर मोफत मिळणाऱ्या सुविधा :-
- पेट्रोल पंपावर वाहनांत पेट्रोल भरल्यानंतर वाहनाच्या टायरमधील हवा भरण्यासाठी एक मशीन पेट्रोल पंपाच्या बाहेर येणाऱ्या मार्गांवर एका कोपऱ्यात असते हे तुम्ही पाहिले असेल. या ठिकाणी तुम्ही तुमच्या वाहनाच्या टायरमध्ये मोफत हवा भरू शकतात. पेट्रोल पंप चालकाने वाहन चालकांसाठी ही सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्याचा नियम आहे. त्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जावू शकत नाही.
- पेट्रोल पंपावर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा असणे किंवा ती व्यवस्था करुन देणे पेट्रोल पंप मालकासाठी अनिवार्य आहे. पेट्रोल पंपावर वाहनांत पेट्रोल भरण्यासाठी आलेले ग्राहक पिण्याच्या पाण्याची मागणी करू शकतात आणि ते उपलब्ध करुन देणे पंप मालकाचे कर्तव्य आहे. यासाठी पेट्रोल पंप मालक आरओ किंवा वॉटर प्युरिफायर लावतात. काही ठिकाणी फ्रिजची देखील व्यवस्था असते. पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करुन देणे पंप मालकाची जबाबदारी आहे.
- पेट्रोल पंपावर शौचालयची सुविधा असणे अनिवार्य आहे. ही सुविधा ग्राहकांसाठी मोफत असावी यासाठी कोणतेही शुल्क आकारले जावू शकत नाही. पंप मालकाने याची काळजी घेणे बंधनकारक आहे. यासोबत पेट्रोल पंपावरील शौचालये स्वच्छ आणि सुयोग्य असावित. यात कोणत्याही प्रकारची अडचण ग्राहकांना येत असेल तर त्यांना तक्रार करण्याचा अधिकार आहे आणि पेट्रोल पंप मालकाने त्यावर स्पष्टीकरण देणे कर्तव्य आहे.
- जर ग्राहकाला आपत्कालीन परिस्थितीत कुणाला फोन करायचा असेल तर पेट्रोल पंपावर टेलिफोनची व्यवस्था असणे पेट्रोल पंप मालकांना बंधनकारक आहे. पेट्रोल पंप सुरू करण्यासोबतच पंप मालकाला एक फोन क्रमांक देखील रजिस्टर करावा लागतो. जेणेकरून पेट्रोल भरण्यासाठी येणारे ग्राहक त्याचा वापर करू शकतील.
- फर्स्ट एड बॉक्स ( First Aid Box) म्हणजेच प्राथमिक उपचार कीट पेट्रोल पंपावर उपलब्ध असणे बंधनकारक आहे. यात प्राथमिक उपचारासाठीची काही औषधे, उपकरणे यांचा समावेश असतो. प्रत्येक पेट्रोल पंप मालकाला ही सुविधा मोफत देणे अनिवार्य आहे. अचानक कोणताही अपघात घडल्यास जखमींना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी या औषधांचा उपयोग होवू शकतो.
- पेट्रोल पंपावर तुम्हाला दिल्या जाणाऱ्या पेट्रोलची गुणवत्ता चाचणी करण्याचाही ग्राहकाला अधिकार आहे. यात तुम्ही गुणवत्तेसोबतच प्रमाणाचीही तपासणी करू शकता किंवा त्याची विचारणा करू शकता. याशिवाय पेट्रोल पंपावर आणखी काही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गोष्टी उपलब्ध असणे अनिवार्य आहे. यात आग विझविण्यासाठी लागणारी उपकरणे जसे की, फायर सेफ्टी स्प्रे, रेतीने भरलेल्या बादल्या आदींचा समावेश आहे.
