* नाही तर १० हजारांचा दंड
रायगड / प्रतिनिधी :- राज्य परिवहन विभागाच्या वतीने सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्याचे निर्देश दिले आहेत. 1 एप्रिल 2019 पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांवर या नंबर प्लेट नाहीत. त्यामुळे 31 मार्च 2025 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा 10 हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असा इशारा परिवहन शाखेकडून देण्यात आला आहे.
1 एप्रिल 2019 नंतर नोंदणीकृत वाहनांवर एसएसआरपी (हाय सेक्युरिटी रजेस्ट्रेशन प्लेट) आधीच बसविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या वाहनांना बसविण्याची गरज नाही. ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट्स विशेष प्रकारच्या अॅल्युमिनियमपासून बनविलेल्या असून, त्यावर परावर्तित रंग आणि युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. या प्लेट्स सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सहज ओळखल्या जावू शकतात, ज्यामुळे वाहन चोरी आणि बनावटगिरी रोखण्यास मदत होते, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सांगितले.
* शुल्क असे…
दुचाकी आणि ट्रॅक्टर : 450 रुपये आणि जीएसटी
तीनचाकी वाहन : 500 रुपये आणि जीएसटी
चारचाकी आणि इतर वाहन : 745 रुपये आणि जीएसटी
* अशी करा नोंदणी...
- ‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी, वाहनमालकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://transport.maharashtra.gov.in) ऑनलाईन नोंदणी करावी.
- शासनाने नियुक्त केलेल्या फिटमेंट सेंटरवर अपॉइंटमेंट घ्यावी. फक्त अधिकृत विक्रेत्यांकडूनच एचएसआरपी बसवावी. अनधिकृत विक्रेत्यांकडून बसविलेल्या प्लेट्सची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होणार नाही.
- नंबर प्लेट चोरीला गेल्यास, नवीन एचआरपीएस मिळविण्यासाठी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. त्यानंतर अधिकृत विक्रेता नवीन नंबर प्लेट उपलब्ध करून देईल.
- संकेतस्थळावर गेल्यानंतर विंडो ओपन होईल. त्यावर ‘अप्लाय एचएसआरपी’ ही लिंक दिसेल.
- त्यावर गेल्यानंतर कार्यालयाची निवड करावी. त्यानंतर बुक एचएसआरपीवर जावून गाडीबाबत सविस्तर माहिती भरावी (वाहन क्रमांक, चेचीस क्रमांक इ.) ही माहिती आरसी बुकवर उपलब्ध आहे.
- त्यानंतर कॅप्चा येईल. मालकाचे नाव दिसून येईल. शासनाने नेमलेल्या केंद्रावर जाऊन किंवा होम डिलिव्हरीची सोयही उपलब्ध आहे. त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
- ऑनलाईन पैसे भरल्यानंतर पावती प्राप्त होईल. नोंदणी झाल्याचा मॅसेजही येईल. दिलेल्या वेळेत नंबर प्लेट बदलून घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले.
* हेही लक्षात ठेवा :-
- एचएसआरपी प्लेट स्पेशल रिव्हेट बोल्टने बसविली जाते, जी सहज काढता येत नाही. वाहन चालकाने याची खात्री करून घ्यावी.
- अपॉइंटमेंटच्या दिवशी दिलेल्या वेळेनुसार निवडलेल्या अधिकृत फिटमेंट सेंटरवर वाहन घेऊन जावे. 90 दिवसांच्या आत ही नंबर प्लेट बसवावी लागेल.
- नवीन एचएसआरपी प्लेटवर आरएफआयडी स्टिकर असेल, ज्यामध्ये वाहनाची संपूर्ण माहिती नोंदविलेली असेल.
- नंबर प्लेट मिळाल्यानंतर ई-मेल किंवा एसएमएसच्या माध्यमातून माहिती मिळेल.
- परिवहन विभागाकडून वाहन विक्रेत्यांव्यतिरिक्त अनेक केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गाडी दुसऱ्या शहरात असेल तर महाराष्ट्रात कुठल्याही केंद्रावर नंबर प्लेट बदलविता येईल.
- महाराष्ट्रात रोस्मार्टा सेफ्टी सिस्टिम लिमिटेड, रियल मॅझॉन इंडिया लिमिटेड आणि एफटीए एसएसआरपी सोल्युशन प्रा. लिमिटेड या तीन कंपन्यांना याचे कंत्राट देण्यात आले आहे.