* पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
कर्जत / विलास श्रीखंडे :- कर्जतमधील यादवराव तासगावकर पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉंलेजची यंदाची वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या वार्षिक क्रिडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. यादवराव तासगावकर शैक्षणिक संस्थेच्या सभागृहात या आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धांमध्ये मिळवलेल्या उज्वल यशाबद्दल पारितोषिक प्रदान करण्यात आली. त्याप्रसंगी शाळेचे प्राचार्य, शिक्षकवृंद, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी वर्षभर घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करताना गटशिक्षणाधिकारी दौंड सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. तसेच खेळामुळे शिस्त, नेतृत्वगुण आणि टीम स्पिरिट वाढत असे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करताना सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. तर, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या व्यवस्थापनासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मनोबल वाढवले.
त्याप्रसंगी या आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही आपल्या विजयाचा आनंद व्यक्त करीत पुढील वर्षी अधिक चांगली कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त करीत आपले विविध क्रिडा क्षेत्रातील कौशल्य अधिक उज्वल कसे होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. तर, या संस्थेतील विद्यार्थी हे शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक अशा सर्वांगीण दृष्टीकोनातून भविष्यात मोठी मजल मारतील हा विश्वास पालकांमध्ये निर्माण झाला असल्याचे अनेक बोलले जात आहे.