कर्जत / प्रतिनिधी :- आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिले काम जर कोणते करणार ते म्हणजे हुतात्मा हिराजी पाटील आणि हुतात्मा भाई कोतवाल यांच्या कार्याचे स्मरण आजच्या पिढीला राहण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून टपाल तिकिट करण्यासाठी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले.
आज, 2 जानेवारी 2025 रोजी सकाळी दहा वाजता कर्जत तालुक्यातील मानिवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारक येथे हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी बोलताना आ. थोरवे म्हणाले की, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांचे बलिदान आम्हां सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. 2 जानेवारी 1942 रोजी सिद्धगडाच्या पायथ्याशी या वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, जेणेकरून आपल्याला स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार करता येईल. त्यांनी स्वातंत्र्यासाठी ज्या संघर्षाचा मार्ग स्विकारला, तो त्याग, त्यांची देशसेवा आणि त्यांच्या नेतृत्वाची क्षमता यांचे आज स्मरण करणे ही आमच्यासाठी फार मोठी जबाबदारी आहे. हुतात्मा भाई कोतवाल हे उच्चशिक्षित होते. त्यांना सगळ्या सुखसोयी उपलब्ध होत्या. पण त्यांनी आपले घरदार आणि सुखाचे जीवन सोडून स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवनाचा त्याग केला.
हुतात्मा हिराजी पाटील आणि हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्मरणार्थ आजच्या युवा पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी सतत कार्यरत राहणे गरजेचे आहे. या स्मारकावर केवळ पुष्पचक्र अर्पण करून आपले कर्तव्य संपत नाही. आपण त्यांच्या बलिदानाला खऱ्या अर्थाने आदर देण्यासाठी पुढील पिढ्यांमध्ये स्वातंत्र्यसेनानींच्या कथा रुजवायला हव्यात.
आज मी जाहीर करतो की हुतात्मा हिराजी पाटील आणि हुतात्मा भाई कोतवाल यांच्या कार्याचे स्मरण म्हणून कर्जत तालुक्यात स्मारक उभारणार. तसेच त्यांच्या बलिदानाची जाणीव सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शैक्षणिक स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अन्य उपक्रम राबवले जातील.
भविष्यातील पिढ्यांनी या देशासाठी योगदान द्यावे, त्याग आणि समर्पणाचे महत्त्व समजून घ्यावे, हीच या कार्यक्रमामागील भावना आहे. मी ग्रामस्थ, शिक्षक आणि युवा वर्गांला विनंती करतो की मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा आणि या वीरांच्या स्मृतींना चिरकाल टिकवून ठेवा.
हुतात्मा हिराजी पाटील यांचा स्मृतिदिन मानिवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारकात आयोजित करण्यात आला होता. कर्जत पंचायत समिती शिक्षण विभाग, मानिवली ग्रामपंचायत आणि हुतात्मा स्मारक समिती मानिवली यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मारकाला पुष्पहार घालून आमदार महेंद्र थोरवे यांनी अभिवादन केले. पुष्पचक्र तालुक्याचे तहसीलदार डॉं. धनंजय जाधव यांनी वाहिले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, हुतात्म्यांचे नातेवाईक विठ्ठल गवळी पाटील, अनुसया जामघरे, शेखर भडसावळे, शरद भगत, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड, माजी सभापती अमर मिसाळ, माजी उपसभापती अरविंद पाटील, माजी सरपंच तुषार गवळी, रवींद्र झांजे, प्रवीण डायरे, लहुदास डायरे, निवृत्त जवान किरण कांबरी, पाणीपुरवठा उपअभियंता मेटकरी, अतिरिक्त गटविकास अधिकारी प्रभाकर बोरकर, ग्रामपंचायत प्रशासक संजय चव्हाण, ग्रामविकास अधिकारी पांडुरंग म्हसे, भाजप तालुका अध्यक्ष राजेश भगत आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात नयन गवळी यांच्या स्वागत गीताने झाली. यावेळी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आणि शहानवाज डोंगरे यांनी एक गाणे सादर केले. तर सुरुवातीला श्रमजीवी विद्यालय पोशीर या शाळेच्या एनएसएस पथकाने संचलन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद पाटील यांनी केले.
