माझा जीव धोक्यात घालणाऱ्या मंडळ अधिकारी पानसरेंवर कार्रवाई करा !

 


* आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष ग्यासूद्दीन खान यांची मागणी

* अवैध उत्खनन व भराव प्रकरणी तक्रार केल्याने खान कुटुंबीय अडचणीत 

खालापूर / विशेष प्रतिनिधी :- उत्खनन व भराव माफियांनी खालापूर तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. शासनाचा महसूल बुडवत डोंगर-टेकड्या नेस्तनाबूत करण्यात येत आहे. तसेच माती, दगड अशा गौण खनिजाची वाहतूक करण्यात येत आहे. शासनाचा महसूल वाचावा यासाठी मी कर्जत प्रातांधिकारी, खालापूर तहसिलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे. परंतु अवैध उत्खनन व भरावविरोधात आवाज उठविल्याने माझ्या व कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. काही दलाल व भराव-उत्खनन करणाऱ्यांकडून माझ्यासह काका, भाऊ, बायको व मित्रांना फोन करून मानसिक छळ कदिला जात आहे आणि या सर्व गोष्टींना मंडळ अधिकारी संदेश पानसरे जबाबदार आहेत. त्यांना फोन केल्यापासूनच माझा जीव धोक्यात आला आहे, तरी माझा जीव धोक्यात घालणाऱ्या मंडळ अधिकारी संदेश पानसरे यांच्यावर कार्रवाई करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे खोपोली शहर अध्यक्ष ग्यासूद्दीन खान यांनी केली आहे. 

खालापूर तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, खालापूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध उत्खनन व भराव मोठ्या प्रमाणात सुरु आहे. माणकिवली ग्रामपंचायत हद्दीत तसेच खालापूर नगर पंचायत हद्दीत तहसील कार्यालयांच्या काही अंतरावर अवैध उत्खनन व भराव सुरु असल्याची माहिती मी मंडळ अधिकारी पानसरे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत दिली. या सुरु असलेल्या अवैध उत्खनन व भरावाची रॉयल्टी भरण्यात आली आहे का? हे विचारले असता मंडळ अधिकारी संदेश पानसरे यांनी 500 ब्रास रॉयल्टी भरण्यात आली आहे, अशी माहिती दिली. 

पण या गाड्या पंधरा दिवसांपासून सुरु आहेत, अशी माहिती मी मंडळ अधिकारी यांना दिली. त्यानंतर एका तासात उत्खनन व भराव करणाऱ्या एका व्यक्तीकडून आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन मंत्री डॉं. रियाज पठाण यांना फोन आले व सदर व्यक्तीने फोनवर धमकी दिली. त्यानंतर तालुक्यातील अनेक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांचे फोन येण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती ग्यासूद्दीन खान यांनी नमूद केले आहे. 

आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष ग्यासूद्दीन खान यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, शासनाच्या महसूलवर डल्ला मारणाऱ्या माफियांची माहिती देणे गुन्हा आहे का ? उद्या व भविष्यात माझ्यावर व माझ्या कुटुंबाला किंवा आम आदमी पार्टीच्या कोणत्याही सदस्याला कोणतीही हानी झाल्यास, धोका निर्माण झाल्यास याला खालापूर मंडळ अधिकारी संदेश पानसरे जबाबदार राहतील. तसेच मी शासनाचा महसूल वाचावा यासाठी प्रयत्न करीत असताना माझ्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी खालापूर मंडळ अधिकारी संदेश पानसरे यांच्यावर भारतीय न्याय संहीतेनुसार कार्रवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील खान यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post