नवोदिताना पत्रकारितेत करिअरच्या अनेक संधी - प्रा. महेश जगताप

 


वसई / प्रतिनिधी :- आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना पत्रकारितेच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. वृत्तपत्र पत्रकार, वाहिन्यावरील पत्रकार, जाहिरात विभाग याबरोबरच सोशल मीडियावरील फेसबुक, एक्स पोस्ट, इन्स्टाग्राम यासारखी विविध माध्यमे उपलब्ध असल्याने या क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे दालन म्हणजे समाजसेवेसोबत विविध समस्यांना वाचा फोडणारे साधन झाल्याचे प्रतिपादन विवा महाविद्यालयाचे प्रा. महेश जगताप यांनी जूचंद्र येथे वसई तालूका पत्रकार संघ, शिवछत्रपती समाज सेवा मंडळ आणि कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पत्रकारिता मार्गदर्शन कार्यक्रमात केले.

या कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार केदारनाथ पाटील, समाज सेवा मंडळ संस्थापक पुरुषोत्तम पाटील, मंडळ अध्यक्ष किरण म्हात्रे, रयत शिक्षण संस्था सातारा, जनरल बॉडी सदस्य विनय गोपीकिसन पाटील, निवृत्त माहिती उपसंचालक निरंजन राऊत, डॉं. हेमंत जोशी, संघाचे अध्यक्ष संदीप पंडित, उपाध्यक्ष भरत म्हात्रे, सचिव आशिष राणे, खजिनदार अरुण सिंग आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रास्तविक पुरुषोत्तम पाटील व मनोगत संदीप पंडित यांनी केले. या कार्यक्रमात बोलताना दुसरे मार्गदर्शक प्रा. अभिषेक माडये यांनी सांगितले की, वाणिज्य शाखेतूनही पत्रकारितेच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. ज्यामध्ये शेअर मार्केट, अर्थव्यवस्था, बँकिंग आदी फायनान्स विषयाबाबत पत्रकारिता करण्याची दालन उपलब्ध आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी वाचन व लेखन यावर आपले प्रभुत्व ठेवणे व सातत्य ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केदारनाथ पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जूचंद्र हे जसे कलाकारांचे गाव आहे तसे त्याठिकाणचे आणि या शाळेचे माजी विद्यार्थी पत्रकारिता क्षेत्रात नावारूपाला आलेले आहेत.  अर्थात त्यांचा आदर्श पुढे ठेवून आताच्या विद्यार्थ्यांनी समाजाला न्याय देणारी पत्रकारिता करावी, असे मार्गदर्शन पाटील यांनी केले. एकूणच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री समाजसेवा मंडळाचे खजिनदार मिलिंद पाटील, मेघनाथ पाटील, संघाचे सदस्य आनंद गदगी, नितांत राऊत, शिवकुमार शुक्ला आदीनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक निलेश गवळी तर आभार मुख्याध्यापक विलास जगताप यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post