वसई / प्रतिनिधी :- वसई तालुक्यात सर्वत्र फेरीवाल्यांचा उपद्रव वाढला आहे, त्यातच अनेक ठिकाणी आठवडा बाजारांनीही रस्ते व्यापले जात असल्याने नागरिकांसह वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या फेरीवाल्याविरोधात तत्कालीन वाहतूक पोलिस निरीक्षक सागर इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिस उपनिरीक्षक महेश गोसावी यांनी कारवाईचा बडगा उगारून ऋषिकेश होटलपासून आनंद नगर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करून रस्ता पादचाऱ्यांसाठी मोकळा केला होता. त्यामुळे पादचारी व वाहतूदरानी समाधान व्यक्त केले होते. मात्र, महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आशिर्वादामुळे पुन्हा या ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे.
या फेरीवाल्यांकडून मोहंमद नामक व्यक्ती अधिकाऱ्यांच्या नावे मोठ्या प्रमाणात हप्ते वसुली करत असल्याची चर्चा आहे. त्यास कोणाचा वरदहस्त आहे हे शोधल्यास पालिका अधिकाऱ्यांचे गौडबंगाल बाहेर पडण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांच्या पाठींब्यामुळे फेरीवाल्यांनी पुन्हा या रस्त्यावर बस्तान मांडले आहे. अतिक्रमण अधिकारी संजय पाटील हे फेरीवाल्यांना पाठीशी घालत असल्याची चर्चा आहे. काही तक्रार आल्यास तेव्हढ्या पुरती कारवाई केल्याचे नाटक करून फोटो सेशनचा दिखावा केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. फेरीवाल्यांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांना तसेच वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. फेरीवाल्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमारी व चैन स्न्याचिंग, चोऱ्यांचे प्रमाणात वाढ झाली आहे.
