* मनमानी कारभाराचा आरोप
खालापूर / सुधीर देशमुख :- वावोशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच दिपाली गणेश गुरव यांच्या विरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव ग्रामपंचायतीच्या ६ सदस्यांनी खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्याकडे १५ जानेवारी २०२५ रोजी सादर केला असून या प्रस्तावामध्ये उपसरपंच दिपाली गुरव यांच्यावर मनमानी कारभार करणे आणि ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
वावोशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच दिपाली गणेश गुरव यांच्या मनमानी कारभाराविषयी सरपंच व सदस्यांमध्ये नाराजी असून त्यांनी हा ठराव मांडला आहे. या संदर्भात तहसीलदार अभय चव्हाण यांनी प्रस्तावाची दखल घेतली असून या अविश्वास ठरावावर चर्चा व निर्णय घेण्यासाठी २२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वावोशी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये पूनम भउड या ग्रामपंचायत सदस्या मात्र उपसरपंच दिपाली गुरव यांच्या बाजूने असल्याचे चित्र दिसून येत आहे.
* अविश्वास ठरावाची मुख्य कारणे :-
१. उपसरपंचांचा मनमानी कारभार
२. सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेणे
* अविश्वास ठराव मांडणारे सदस्य :-
१. अश्विनी उदय शहासने (सरपंच)
२. मयुर स्मेश धारवे
३. भारती मारुती नाईक
४. रिया रूपेश वालम
५. मंजुळा चंद्रकांत पवार
६. मच्छिंद्र जनार्दन वाघमारे
खालापूर तहसीलदारांनी सर्व सदस्यांना वेळेवर उपस्थित राहण्याचे निर्देश दिले असून या विशेष सभेत ठरावावर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे ही घटना वावोशी ग्रामपंचायतीच्या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींमध्ये महत्त्वाची ठरू शकते, असे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
