* दोन वर्ष झाले रस्ता होत नाही, घरात आणि दुकानात साचले धुळीचे थर
खोपोली / प्रतिनिधी :- पेण-खोपोली रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 डी याचे काम मागील दोन ते तीन वर्षापासून सुरू असून खोपोली नगर परिषद हद्दीतील ऋषीवन हॉटेल ते इंदिरा गांधी चौक पर्यंतचा रहिवाशी भाग असलेला एक किलोमीटरचा पट्टा पूर्ण करण्यात प्रचंड विलंब होत आहे.
सदर रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग उपविभाग यांच्यामार्फत जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यांना देण्यात आलेले आहे. खोपोली नगर परिषद हद्दीत नगर पालिकेची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन व गेल गॅस कंपनीची पाईपलाईन हे अडथळे होते. परंतु आम आदमी पार्टीच्या प्रयत्नांनी नगर परिषद पाईपलाईन व गेल गॅस लाईन यांचा अडथळा दूर करण्यात आलेला आहे. तरीसुद्धा जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी मार्फत सदर रस्त्याचे काम मुंगीच्या गतीने सुरू आहे.
एक साधीशी गटार बनविण्यासाठी सुद्धा त्यांना दोन दोन महिने लागत आहेत. त्यामुळे सदर परिसरात राहणारे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. दररोज घरांमध्ये, दुकानांमध्ये धुळीचा थर साचत आहे. नागरिक प्रचंड त्रस्त झालेले आहेत व संतापले असून लवकरात लवकर जर सदर काम पूर्ण झाले नाही तर मोठे आंदोलन उभे करण्यात येईल, असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉं. रियाज पठाण यांनी सांगितले.