* मृताच्या टाळूवरचे लोणी कुणी कुणी खाल्ले?
* तिसऱ्या मजल्यावरून पडून कामगार मृत्यूमुखी?
* खोपोली नगर परिषद हद्दीतील दुःखद घटना ?
खालापूर / विशेष प्रतिनिधी :- खोपोली शहरासह खालापूर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. शहर व उपनगर परिसरातील सर्वच भागात नवनविन गृहप्रकल्प मोठ्या दिमाखात उभे राहतांना दिसत आहेत. उंचच उंच इमारती बनवितांना सुरक्षा नियमांची मात्र सर्रासपणे पायमल्ली होत आहे. पण संबंधित विभाग कुंभकर्ण झोपेत असल्याने दररोज लहान-मोठे अपघात होत असूनही यहां सब शांती शांती है...या लहान-मोठ्या अपघातात अनेक कामगारांना दुखापती देखील होत असतात. पण नुकतेच एका गृहप्रकल्पाच्या कामादरम्यान एक बांधकाम मजूर तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत पावल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. एक कामगार मृत पावला असला तरी 'महालक्ष्मी' कृपेने इतर कामगार, मजूर सुरक्षित असल्याचे समजते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपनगरातील एका डिपी रोड परिसरात एका मोठ्या गृहप्रकल्पाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. शासकीय परवानगी व नियमानुसार या गृहप्रकल्पाचे काम जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे. या कामावर अनेक गरीब, गरजू स्थानिक तथा परप्रातीय कामगार काम करीत आहेत. सध्या तिसऱ्या मजल्याचे काम सुरू असतानाच एक कामगार सुरक्षा उपकरणा अभावी पडला आणि यात त्याचा मृत्यू झाला असल्याचे समजते. उन्हातान्हात काम केले...आयुष्यभर राब-राब राबला पण मृत्यूनंतरही या मजुराला न्याय मिळाला नसल्याचे दिसून येत आहे. एका बांधकाम मजुराचा मृत्यू अनेकांसाठी 'मलिदा' ठरला असल्याचे दिसून येत आहे. 'मृताच्या टाळूवरचे लोणी' अनेकांनी खाल्ल्याने त्याबाबत चांगलीच गुप्तता पाळण्यात येत आहे. त्या मजुराची साधी बातमी छापून आली नसल्याचे दिसून येत असतानाच शासकीय कागदपत्रात देखील बिचाऱ्याचा मृत्यू हरवल्याची चर्चा सुरू आहे.
शहर व उपनगर परिसरात सुरक्षा उपकरणाशिवाय मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. अनेक मजूरांचा जीव धोक्यात आहे. बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार, गृह प्रकल्पाचे प्रमुख आपली झोळी भरण्यात ऐवढे व्यस्त आहेत की, कामगारांचा जीव त्याच्यासाठी स्वस्त झाला आहे. कामादरम्यान कामगाराचा मृत्यू झाला तरी बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार, गृह प्रकल्पाचे प्रमुख यांना तसूभरही फरक पडत नाही. त्याचप्रमाणे सदर प्रकरण पेटलेच तर सदर बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार, गृह प्रकल्पाचे प्रमुख 'मृताच्या टाळूवरचे लोणी' थोडे थोडे वाटून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करतात आणि सदर मृत्यू, अपघात, भानगडी शासकीय फाईलीत दाबले जाते.
दरम्यान, उपनगर परिसरात झालेल्या या घटनेतील कामगाराला न्याय मिळेल का? पोलिस उपविभागीय अधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी या प्रकरणाचा छडा लावणार का? तपास करून दोषींवर कार्रवाई होणार का ? की धूळ पडलेल्या फाईलीत अजून एकाने वाढ होईल व 'मृताच्या टाळूवरचे लोणी' खाणारे सर्व खाऊन हजम करतील का? खाकी गणवेशासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक, गृह प्रकल्पाचे प्रमुख, तलाठी, मंडळ अधिकारी, मुख्याधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी गाढ झोपेचा आनंद घेत राहतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
