* विकास वर्तक : राष्ट्रीय युवा महोत्सवात लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या कलाकारांची भव्य शोभायात्रा
वसई / प्रतिनिधी :- कोणतेही यश प्राप्त करण्यासाठी कठोर मेहनत अत्यंत आवश्यक असते. या मेहनतीतूनच विद्यार्थी घडत असतो, असे प्रतिपादन विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विकास वर्तक यांनी केले. अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील राजाणी सभागृहामध्ये आयोजित केलेल्या अभिनंदन आणि गुणगौरव सोहळ्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संस्थेतर्फे सर्व प्रकारचे पाठबळ देण्याची घोषणा या सोहळ्याचा अध्यक्षीय समारोप करताना विकास वर्तक यांनी केली. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युवा महोत्सवात झालेल्या लोकनृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवत महाराष्ट्राला गौरव प्राप्त करून देणाऱ्या वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या संघाचा ब्लेझर, स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक व पुष्पगुच्छ देऊन यावेळी विद्यावर्धिनी शिक्षणसंस्था परिवारातर्फे गौरव करण्यात आला.
भारत सरकारच्या युवा आणि खेळ मंत्रालयातर्फे नवी दिल्ली येथे १० ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान 'विकसित भारत @२०४७' ह्या शीर्षकांतर्गत झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात पारंपरिक लोकनृत्य स्पर्धेत अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या संघाने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत 'दिवली' हे लोकनृत्य सादर केले होते.
२६ जानेवारीनिमित्त आयोजित झेंडावंदन कार्यक्रमानंतर अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉं. अरविंद उबाळे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाचे प्रांगण, डॉं. बाबासाहेब आंबेडकर चौक, माणिकपूर पोलिस स्टेशन ते विद्यावर्धिनी अभियांत्रिकी महाविद्यालय व पुन्हा वर्तक महाविद्यालय अशी लोकनृत्यात सहभागी कलावंतांची विजयी शोभायात्रा यावेळी काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शोभायात्रेनंतर राजाणी सभागृहामध्ये पार पडलेल्या कौतुक सोहळ्याचे प्रास्ताविक अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉं. अरविंद उबाळे यांनी केले. सांस्कृतिक विभागप्रमुख डॉं. सखाराम डाखोरे, लोकनृत्याचे दिग्दर्शक भूषण पाटील, विद्यावर्धिनी शिक्षणसंस्थेचे उपाध्यक्ष बबनशेठ नाईक यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
विद्यावर्धिनी शिक्षणसंस्थेचे सदस्य रवी मोहोळ, मोहन घरत आणि श्रीमती चित्रा पाटील यांच्यासह अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे शिक्षक प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने या गुणगौरव कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. डॉं. शत्रुघ्न फड, डॉं. महादेव आंधळे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन केले होते. डॉं. श्रीराम डोंगरे, प्रा. आदिती यादव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉं. अनिलकुमार शेळके यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.