बारामती / अक्षय कांबळे :- पुण्यात भविष्यात मोठ्या पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (मेरी) दिला आहे. मेरीने जलसंपदा विभागाला सादर केलेल्या अहवालानुसार, आगामी काळात मुठा नदीची निळी आणि लाल पूररेषा ही सध्याच्या पूररेषेपेक्षा किमान दीडपटीने विस्तारणार आहे.
मेरीच्या अहवालानुसार पुढील २५ वर्षांत मुठा नदीत पावसाच्या पाण्यात १.८ पटीने वाढ होणार आहे. १०० वर्षांत हे प्रमाण अडीच पट असेल. मुळा नदीमध्ये पुढील २५ वर्षांत १.८२ पट पावसाचे पाणी वाढेल, तर १०० वर्षांत २.७ पट पाणी वाढणार आहे. नदीतील लाल पूररेषा ही दोन लाख ५४,७१९ क्युसेकच्या विसर्गापर्यंत विस्तारणार आहे. तर निळी पूररेषा एक लाख ७,७२४ क्युसेकपर्यंत विस्तारणार आहे.
* पूररेषा विस्तारल्याने काय होईल ?
पूररेषा विस्तारल्यास नदीकाठची अनेक घरे आणि इमारती धोक्याच्या क्षेत्रात येतील. पुण्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. नदीकाठच्या विकासकामांवर देखील याचा परिणाम होईल.
* उपाययोजना काय ?
पर्यावरण अभ्यासक सारंग यादवडकर यांनी पुणे शहराला आगामी पुराचा मोठा धोका असल्याचा इशारा दिला आहे. नदीपात्रात सरकारी, बिगर सरकारी असलेली अतिक्रमणे तातडीने काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.