लाईट ऑफ लाईफ ट्रस्टकडून प्रमाणपत्रांचे वाटप

 

* इंग्लिश स्पिकिंग, पत्रकारीता, इलेक्ट्रिशिअन, एसी दुरूस्ती प्रशिक्षण पूर्ण, 50 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान

कर्जत / मानसी कांबळे :- लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट जागृती विभागाकडून युवक सक्षमीकरण आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण अल्प दरात विद्यार्थ्यांसाठी दिले जातात. त्यातील इंग्लिश स्पिकिंग, पत्रकारिता, इलेक्ट्रिशिअन, एसी दुरूस्ती प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आज शुक्रवार, 31 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट, राजमहल बंगला येथील कार्यालयात संपन्न झाला. यावेळी जागृती विभाग लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट मुख्य व्यवस्थापक गौतम कनोजे, बारवई स्कूलचे प्रिन्सिपल ॲंड. विलास बागूल, गौलवाडी ज्युनिअर कॉलेज प्रिन्सिपल रंगराव राठोड, लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट पीआरओ (PRO) आणि पत्रकारिता प्रशिक्षक विद्यानंद ओव्हाळ, प्लेसमेंट ऑफिसर तानाजी मिणमिणे, सेंटर को-ऑर्डिनेटर सागर खंडागळे, कम्युनिटी मोबिलायझर राजू ढोले, वाल्मीक राठोड, राजेंद्र बोडके, दैनिक कोकण प्रदेश न्यूजचे संपादक तथा न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना आपले मनोगत मांडत विविध प्रशिक्षण हे आपल्याला गरजेचे आहे. फक्त पुस्तकी ज्ञान गरजेचे नाही तर समाजात वावरतांना आपल्याला रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी देखील आपल्याला झालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग होईल याची ग्वाही देत मनोगत व्यक्त केले.

मुख्य व्यवस्थापक गौतम कनोजे म्हणाले की, आजची युवा पिढी जास्तीत-जास्त मोबाईल आणि आळशीपणा यामध्ये व्यस्त आहेत. त्यांना जास्तीत जास्त प्रशिक्षण घेऊन स्पर्धा परिक्षामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे, त्यासाठी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या माध्यमातून 'स्टडी सेंटर' उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील. ज्या विद्यार्थ्यांना 'स्टडी सेंटर'मध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपली नावे लाईट ऑफ लाईफ ट्रस्टकडे नोंदवावीत, असे आवाहन केले. प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post