खालापूरकरांचे आरोग्य धोक्यात?

 

* नदी व रस्त्याला लागून प्लास्टिक कचरा पेटविणाऱ्यांवर कार्रवाईसाठी ग्रामविस्तार अधिकारी यांना हवे पत्रकारांकडून लेखी अर्ज...

खालापूर / विशेष प्रतिनिधी :- गेल्या वर्षभरापासून खालापूर पंचायत समिती आपल्या दुर्लक्षपणामुळे रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रात प्रसिद्ध पावली आहे. याच पंचायत समिती हद्दीतील ग्रुप ग्रामपंचायत परिसरात पालीफाटा येथील एक्सप्रेस-वे बायपासहुन जाणाऱ्या  रस्त्याला व ठाणेन्हावेहुन येणाऱ्या नदीला लागून मोकळ्या जागेत डम्पिंग ग्राउंडसारखा कचरा टाकण्यात येत आहे. तसेच हा टाकण्यात आलेला प्लास्टिक कचरा रात्रीच्या सुमारास थेट पेटविला जात आहे. त्यामुळे  निघणाऱ्या धुरामुळे ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून कचऱ्यात असलेल्या प्लास्टिकसह इतर गोष्टींच्या धुरांमुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. पेटलेल्या कचऱ्याच्या आगीचे लोट उठून आकाशात काळ्या व पांढऱ्या धुराची चादर पसरल्याचे चित्र दिसून येत असते. तसेच कचरा नदीमध्ये देखील टाकून नदीचे पाणी दूषित केले जात असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. या नदीचे पाणी पातळगंगा नदीत जावून मिसळत आहे. पातळगंगा नदीचे पाणी एमआयडीसीतील कंपनी व परिसरातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये पिण्यासाठी वापरले जात असते. या ठिकाणी अखेर हा कचरा कोण ? व कुणाच्या आशिर्वादाने टाकून पेटवत आहे ? ग्राम पंचायत प्रशासन व खालापूर पंचायत समिती प्रशासन काय करते? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

या गंभीर समस्येविषयी माहिती घेण्यासाठी खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना पत्रकारांनी दूरध्वनीवरून सपंर्क साधला असता गटविकास अधिकारी कराड यांनी पत्रकारांचे फोन उचलण्याचे कष्ट घेतले नाहीत व तसेच फोनचा उत्तरही दिले नाही. ग्रामविस्तार अधिकारी तांडेल यांना पत्रकारांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता व पालीफाटा येथील एक्सप्रेस-वे बायपास लगत जाणाऱ्या रस्त्यावर व नदीला लागून कचरा टाकून पेटविला असल्याची माहिती दिली. या कचऱ्याविषयी माहिती विचारली असता तांडेल यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले की, तो कचरा कोण पेटवतो...मला तर नदीच माहीत नाही...मला कसे माहीत असेल, तुम्ही लेखी द्या...टायपिंगमध्ये द्या, मी चौकशी करतो. पत्रकारांनी पुढे विचारले की, आपण विस्तार अधिकारी आहात. संबंधित ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकांना विचारून माहिती घ्या. पत्रकारांचे काम आपल्या निदर्शनात आण्याचे आहे. आपल्याला शासनाकडून कामाचा पगार मिळतो, असे बोलले असता ग्रामविस्तार अधिकारी तांडेल हे रागावले व मला पगार मिळतो हे तुम्ही मला शिकवू नका...पगार कसले मिळतात हे मला चांगले माहिती आहे. तुम्ही मला काय असेल ते लेखी द्या, मग मी बघतो असू उत्तर दिले. अशा बेजबाबदार, कामचुकार विस्तार अधिकारीला पालीफाटा येथील नदी माहीत नसेल, त्यांना ग्रामपंचायतीच्या समस्या काय माहीत असणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


खालापूर तालुक्यात अनेक ठिकाणी डम्पिंग ग्राउंड नसताना मोकळ्या जागेवर कचरा टाकला जातॊ आणि रात्रीच्या सुमारास हा कचरा पेटवला जातो. या प्रत्येक ठिकाणाची माहिती लेखी टायपिंगमध्ये पत्रकारांनी द्यायची आणि या लोकसेवकांनी एसी, पंख्याखाली दालनात बसून बसून पगार...वेतन... शासनाच्या सर्व सोयीसुविधा घेऊवून आराम का ? एखाद्या ठिकाणी चुकीचे काम होत असेल तर लेखी तक्रार दिल्याशिवाय त्यावर कार्यवाही करता येत नाही का ? तक्रार करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना व पत्रकारांना  दालनाबाहेर तासन्तास बसायचे का ? तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीमध्ये नक्की काय व कोणता कारभार सुरू आहे, याची पाहणी करण्याची या अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही का ? भारतीय दंड संहितेच्या कलम 21 नुसार, शासनाच्या प्रत्येक लोकसेवकाने प्रथम लोकसेवक म्हणून आपले कर्तव्य पार पाडणे आवश्यक असून प्रत्येक शासकीय अधिकारी व कर्मचारी हा लोकांचा सेवक असून या देशातील गरीबातील गरीब व्यक्तीदेखील या देशाचा मालक आहे. तथापी, खालापूर तालुक्यातील पंचायत समितीमधील काही शासकीय अधिकाऱ्यांना या कर्तव्याचे विस्मरण झाल्याचे दिसून येत आहे. कलम 21 हे शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देणारे आहे, जेणेकरून ते लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने कार्य करतील. परंतु, काही वेळा या अधिकाऱ्यांची वागणूक आणि कामाची पद्धत लोकांच्या अपेक्षांच्या विपरीत असते. पत्रकार हा देशाचा चौथास्तंभ मानला जातो. कलम 21 हा विसर पडलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देणारे आहे. या लोकसेवकांना मिळणारा पगार हा जनता जनार्दनाच्या खिशातून जाणाऱ्या पैश्यातून मिळत आहे, हे ही त्यांनी विसरू नये ? अशी नाराजी व्यक्त करीत ग्रामस्थ व पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 

दिवसेंदिवस एकापेक्षा एक महाभयंकर आजाराने तोंड वर काढले आहे. सर्वसामान्य माणसाला या आजारांचा सामना करावा लागत आहे. डेंगू, मलेरिया, कोरोना, दमा, अस्थमा, जीबीएससारख्या आजारांवर उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये मोजावे लागतात. पैसे नाही तर उपचार नाही ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असतांना व्यावसायिकांनी पैसे कमवायचे, लोकसेवकांनी दुर्लक्ष करायचे आणि नागरिकांनी रोगराईला बळी पडत आपले जीव गमवायचे का ? कोरोनासारख्या महाभयानक आजाराची शिकवण या लोकसेवकांना राहिलेलीच नाही का ? ग्रामस्थांचे जीव गेल्यावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी व पुरस्कार घेण्यासाठी हे लोकसेवक येणार का ? खालापूर तालुक्यात ग्रामपंचायतीमध्ये काय कारभार सुरू आहे याची माहिती जर विस्तार अधिकारी यांना नसेल तर विस्तार अधिकारी नेमके कुणाच्या व कोणत्या  कामासाठी ठेवण्यात आले आहेत ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post