* वांजळे येथील भैरवनाथ ग्रामदैवत ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप ठाकरे यांची मागणी
* मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भैरवनाथ ग्रामदैवत ट्रस्टद्वारे निवेदन
कर्जत / विशेष प्रतिनिधी :- अनमोल डेव्हलपर्स यांनी वांजळे येथील गट नं. 4 व 5 मध्ये "नेचर" नावाने गृहप्रकल्प उभारला आहे. या ठिकाणी मोठा गृह प्रकल्प उभा राहिला आहे. पण या गृह प्रकल्पातील सांडपाणी व शौचालयातील पाण्याचा निचरा करण्यात आलेला नाही. तरी या गृह प्रकल्पातील सांडपाणी भैरवनाथ ग्रामदैवत ट्रस्टच्या जागेत सोडण्यात आल्याने ग्राम दैवतचा अपमान होत आहे. तरी वांजळे येथील ग्राम दैवत भैरवनाथ महाराज यांचा अपमान करणाऱ्या पटेल बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा हिंदुत्ववादी संघटनांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भैरवनाथ ग्रामदैवत ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हिंदु स्वाभिमानी सरकार कार्यन्वित आहे. आज देशभरात हिंदु देवी-देवतांची विटंबना थांबली आहे. सर्वत्र प्रखर, जाज्वल्य हिंदुत्वाचा हुंकार भरला जात आहे. परंतु कर्जत (जि. रायगड) तालुक्यातील वांजळे गावात याच्या उलट परिस्थिती दिसून येत आहे. एक बिल्डर पैसा व शासकीय अधिकारी यांना सोबत घेवून आमच्या आस्थेचा...धार्मिक भावनांचा अपमान करीत आहे. गटार, शौचालयाचे दुषित, घाणेरडे, अशुध्द सांडपाणी मागील कित्येक वर्षापासून आमच्या ग्राम दैवत भैरवनाथ महाराज यांच्या मालकीच्या असलेल्या जागेत सोडत असून या दुषित, घाणेरडे, अशुध्द सांडपाण्यामुळे आमची धार्मिक जागा अशुध्द व नापिक होत आहे. देशात व राज्यात हिंदु नेतृत्व असतांना आमच्या धर्माचा...आमच्या देव-देवतांचा...आमच्या ग्राम दैवताचा...आमच्या धार्मिक भावनाचा अपमान केला जात आहे आणि या सर्वात त्यांना रायगड जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हा अधिकारी, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सिईओ), कर्जत प्रातांधिकारी, कर्जत गटविकास अधिकारी (बिडीओ), कर्जत तहसिलदार, किरवली ग्राम पंचायत ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी व पोलिस प्रशासन आदी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची साथ मिळत आहे, तरी या सर्वांवर कार्रवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रदीप ठाकरे यांनी केली आहे.
निवेदनात पुढे प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे की, हिंदु समाज...हिंदु देव-देवता...ग्राम दैवत यांचा असाच अपमान होत राहिल का? हिंदु समाजाने आपल्या देव-देवतांचा अपमान फक्त उघड्या डोळ्यांनी पाहत रहायचे का? एखाद्या बिल्डरकडे कोट्यवधी रुपये आहेत, त्याची राजकीय ओळख आहे, त्याची शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत उठबैस आहे, त्याच्याकडे वकीलांची फौज आहे...तर त्याला हिंदु समाजाचा, त्यांच्या देव-देवतांचा अपमान करण्याचा लायसन्स (परवाना / परवानगी) मिळतो का? मुख्यमंत्री साहेब आम्ही हिंदु नागरीक, हिंदु देव-देवतांचे भक्त, ग्राम दैवत ट्रस्टचे पदाधिकारी यांनी आपल्या देव-देवतांचा अपमान होत असतांना षडंसारखे बसून रहावे का ? मुख्यमंत्री साहेब आपल्याकडून तरी हिंदु भक्तांना, हिंदु समाजाला, भैरवनाथ ग्रामदैवत ट्रस्टला न्याय मिळेल का? की फक्त निवडणूक व घोषणांपुरतेच सरकारचे हिदुत्व आहे का? असा प्रश्न देखील विचारण्यात आला आहे.
अनमोल डेव्हलपर्स यांनी वांजळे येथील गट नं. 4 व 5 मध्ये "नेचर" नावाने गृहप्रकल्प उभारला आहे. या गृह प्रकल्पातील सांडपाणी व शौचालयातील पाण्याची कोणतीच व्यवस्था करण्यात आली नसल्याचे दिसून येते. तरी या गृह प्रकल्पातील सांडपाणी भैरवनाथ ग्रामदैवत ट्रस्टच्या जागेत सोडण्यात येत आहे. आम्ही या ठिकाणी भविष्यात मंदिर उभारण्याचे स्वप्न पाहत आहोत. आमचे मंदिर एका बिल्डरमुळे अस्वच्छ सांडपाणी साचलेल्या अस्वच्छ, नापिक जमीनीत उभे राहिल का? त्याचप्रमाणे वेळीच अस्वच्छ पाणी, सांडपाणी बंद झाले नाही तर आम्ही आमच्या देवाच्या मंदिरात अस्वच्छ, घाणेरड्या, शौचालयातील सांडपाणीतून जावे, असा प्रश्न देखील निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.
आमच्या धार्मिक भावना दुखाविणाऱ्या पटेल बिल्डरसह टीपी विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच रायगड जिल्हाधिकारी, कर्जत प्रांताधिकारी, कर्जत तहसिलदार व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही हिंदु नागरीक, समाज बांधव शांत बसणार नाही. वांजळे गावासह संपूर्ण कर्जत तालुक्यात तीव्र आंदोलन छेडू. गरज पडल्यास आम्ही आमच्या धार्मिक भावना दुखाविणाऱ्या बिल्डर व शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना धडा शिकविण्यास मागे-पुढे पाहणार नाही. आमच्या धर्माचा...आमच्या देव-देवतांचा अपमान रोखण्यासाठी आम्हाला जीव द्यावा लागला तरी आम्ही मागे हटणार नाही व उद्या आमच्या हातून धर्माची, धार्मिक स्थळाची, ग्राम दैवतची रक्षा करताना अघटीत घडले तर त्याला आपल्यासह संपूर्ण प्रशासन व रायगड जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील, असा इशारा देखील भैरवनाथ ग्रामदैवत ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप ठाकरे यांनी दिला आहे.