* जिल्ह्यात घारापुरी, उंदेरी, खांदेरी, कुलाबा किल्ला, जंजिरा, कासा, पद्मदुर्ग, आणि सर्जेकोट या बेटांवर ध्वजारोहण
अलिबाग / प्रतिनिधी :- राष्ट्रीय एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देशभर पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने यंदा पहिल्यांदाच एक ऐतिहासिक उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील ६२ बेटांवर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकतेचा संदेश पोहोचवणे, भारतीय संस्कृतीचा प्रचार करणे आणि भारताच्या महासागरी सीमांचा अभिमान जागवणे आहे.
या अनोख्या उपक्रमाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील घारापुरी, उंदेरी, खांदेरी, कुलाबा किल्ला, जंजिरा, कासा, पद्मदुर्ग आणि सर्जेकोट या बेटांवर ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात स्थानिक प्रशासन, तटरक्षक दलातील अधिकारी, माजी सैनिक, ग्रामस्थांचा सहभाग लाभला.
हा उपक्रम देशातील ऐतिहासिक स्थळांच्या जतनासाठी आणि देशवासीयांमध्ये राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. यामुळे युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचविण्यास मदत होईल आणि भारतीय समुद्री परंपरेची जाणीव होईल.