* अवघ्या 12 वर्षाच्या परवेज अलीचा आईच्या उपचारासाठी संघर्ष
मुंबई / मानसी कांबळे :- परवेज अली हा 12 वर्षाचा बाळ मंत्रालय परिसरात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी फिरत होता. कारण होते त्याच्या आई शबाना अली यांना केईएम रुग्णालयात 'पिकेसतुला' या आजाराच्या शस्त्रक्रियेबाबत उपचार मिळण्याबाबत...कसाबसा त्याने मंत्रालयात प्रवेश मिळवला. मुख्यमंत्री मंत्रालयात नसल्यामुळे तो एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांचे दालन शोधू लागला. परंतु दुर्दैवाने 20 मिनिटांसाठी त्याची भेट हुकली. नंतर भेटायचे तर कुणाला अशा हताश झालेल्या अवस्थेत त्याला प्रवेश अजितदादांच्या दालनाबाहेर भेटला. त्यांने त्याची व्यथा मांडली, परंतु अजित दादांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला 'त्या' बालकाच्या अडचणी सोडवण्याबाबत सांगितले. परंतु त्याला आवश्यक ती मदत मिळू शकली नाही म्हणून हताश परवेज मंत्रालयाबाहेर निघाला.
त्या मुलाची व्यथा मंत्रालयात बाहेरील लोकांना कळाली. या वयात हा मुलगा आईच्या उपचारासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना देखील भेटण्यासाठी धडपड करतोय. त्यातच ही गोष्ट रोहित पवारांच्या कार्यकर्त्याला कळाली. त्याने रोहित पवारांचे व हताश परवेजचे व्हिडिओ कॉलद्वारे बोलणे करून दिले. रोहित पवार यांनी ही केईएम हॉस्पिटलचे डॉं. बांगरांशी बोलणे केले व त्यांच्या स्वीय सहायकाला मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातील रामेश्वर नाईक व उपमुख्यमंत्री सहायता निधी कक्षातील मंगेश चिवटे यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले.
त्यानुसार मंगेश चिवटे यांनी त्यांचे सहकारी प्रसाद सूर्यराव यांना तात्काळ केईएम हॉस्पिटलला पोहोचण्यासाठी सांगितले. तोवर रोहित पवारांचे कार्यकर्ते देखील रुग्णालयात पोहोचले होते. अखेर हताश झालेल्या परवेजच्या आईला केईएम रुग्णालयात तात्काळ बेड उपलब्ध करून उपचार सुरू करण्यात आला. डॉं. बांगर, मंगेश चिवटे व त्यांचे सहकारी समाजसेवक प्रसाद सूर्यराव, विकास पेडणेकर, अमोल मुरब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल 12 वर्षाच्या परवेझने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आ. रोहित पवार, उपमुख्यमंत्री सहायता निधी कक्षातील मंगेश चिवटे यांचे आभार मानले.