कर्जत / विशेष प्रतिनिधी :- कर्जत तालुका आरोग्य खात्यात काम करणारे कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रवीण भोईर यांनी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे आशा सेविकांकडून आलेले जवळपास 7 हजार 700 महिलांचे फॉर्म मागच्या कित्येक वर्षात ऑनलाईन केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर कर्जत आरोग्य खात्याकडून विविध वर्तमानपत्रांना दिशाभूल करणारी माहिती देण्यात येत आहे. रायगड जिल्हा आरोग्य खात्याकडून दिलेल्या माहितीमध्ये योजनेचे पोर्टल फेब्रुवारी 2023 मध्ये बंद झाले असून ते नोव्हेंबर 2023 मध्ये सुरु झाल्याने देशात कुठेही 9 महिन्यात फॉर्म ऑनलाईन झाले नसल्याचे म्हटले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने महिला वर्गांने मोठ्या प्रमाणात आधारकार्ड आपल्या बँक खात्याला लिंक केल्याने ऑनलाईन होऊ शकले नसलेले अर्ज आता यशस्वीरीत्या ऑनलाईन होऊ लागले आहेत व त्यामुळे मातृ वंदना योजनेचे अनुदान अनेक महिलांना मिळू लागले आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. तसेच तालुकास्तरावरून असे सांगण्यात आले की, पंचायत समितीकडून कोणालाही कुठली माहिती दिलेली नाही, जी माहिती संबंधितांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे ती चुकीची आहे. ज्या महिला अनुदानापासून वंचित राहिल्या आहेत त्यांची संख्या फार अत्यल्प आहे.
पंतप्रधान मातृ वंदन योजनेचे तक्रारदार व माहिती अधिकार कायद्याखाली माहिती घेणारे...तसेच आरोग्य विभागातील सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रवीण भोईर याने माहितीच्या अधिकारात दिलेल्या दि. 6 फेब्रुवारी 2024 रोजीच्या पत्रामध्ये अशी माहिती दिली आहे की, योजनेचे पोर्टल हे 20 मार्च 2023 रोजी बंद झाले व नोव्हेंबर 2023 मध्ये पोर्टल सुरु झाले. नवीन पोर्टलवर फॉर्म ऑनलाईन करताना फॉर्ममध्ये 180 दिवसाच्या आत मासिक पाळीची तारीख असेल तरच पोर्टलवर नोंदणी होते. अन्यथा संबंधित महिलेचा फॉर्म ऑनलाईन होत नाही. तसेच ज्या कालावधीत पोर्टल बंद होते, त्या आधीच्या कालावधीतील पात्र लाभार्थींची नोंदणी सद्य स्थितीत पोर्टलवर होत नाही. म्हणजेच सन 2017 ते मार्च 2013 पर्यंतचे जे फॉर्म आशा सेविकांनी आरोग्य खात्याकडे दिलेले आहेत, त्याची अजूनपर्यंत नोंदणी झालेली नाही आणि आता नोंदणी होणे शक्यच नाही. जर फॉर्म ऑनलाईन झालेच नाहीत तर त्यांना लाभ कसा मिळायला सुरुवात झाली आहे हे कळणे गूढच असल्याचे तक्रार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
आरोग्य विभागाच्या म्हणण्याप्रमाणे जर वंचित राहिलेल्या महिलांना लाभ मिळणे सुरु झाले आहे तर, नोव्हेंबर 2024 मध्ये पोर्टल सुरु झाल्यानंतर आशा वर्करांनी कर्जत आरोग्य खात्याकडे दिलेल्या सन 2017 ते मार्च 2023 पर्यंतच्या फॉर्मपैकी किती फॉर्म ऑनलाईन केलेत आणि त्यापैकी किती महिलांना लाभ मिळाला आहे, त्याची यादी व आकडेवारी आरोग्य विभागाने जाहीर करावी, असे आवाहन तक्रार यांनी पत्रकारांशी बोलतांना केले आहे.
माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीवरून कर्जत तालुका प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची संपूर्ण माहिती उपलब्धच नाही. ऑफिसमध्ये याचे कोणतेही रजिस्टर नाही, तर मग आरोग्य विभाग प्रसारमाध्यमांना कोणत्या आधारावर माहिती देत आहेत, हे लाभार्थ्यांना माहिती होणे आवश्यक आहे. तसेच तालुका आरोग्य विभागाने माहितीच्या अधिकारात, प्राथमिक आरोग्य केंद्राप्रमाणे व गावनिहाय दिलेली संख्या ज्या कागदपत्रांवरून दिली आहे ती कागपत्रे माहितीच्या अधिकारात मागण्यात आली पण ती कागदपत्रे सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत. म्हणजेच तालुका आरोग्य विभागाने दिलेली माहिती ही अंदाजे दिली असण्याची शक्यता आहे, असा आरोपही तक्रारदार यांनी केला आहे.
माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये, आशा वर्करांनी कर्जत तालुका आरोग्य विभागाकडे दिलेल्या फॉर्मची माहिती, सन 2020-21, 2021-22, 2022-23 मध्ये ज्या लाभार्थी महिलांना लाभ मिळाला आहे. मार्च 2023 अखेरपर्यंत ऑनलाईन केलेल्या पण पैसे मिळण्याचे शिल्लक असलेल्या लाभार्थींची यादी आणि सन 2017 ते मार्च 2023 पर्यंत एकूण ऑनलाईन केलेल्या आणि लाभ दिलेल्या लाभार्थींची संख्या दाखविणारा तक्ता यावरूनच 7 हजार 700 इतक्या महिला वंचित राहिल्याची माहिती समोर आली आहे व ही सर्व आकडेवारी कर्जत पंचायत समितीला पत्राद्वारे कळविण्यात आली आहे.
रायगड जिल्हा व कर्जत तालुका आरोग्य विभागाकडून माहिती शोधून काढून संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याऐवजी संबंधित कर्मचाऱ्याला वाचविण्यासाठी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालला आहे असा आरोप देखील तक्रारदार यांनी केला आहे. तसेच आशा वर्करांनी कर्जत तालुका खात्याकडे सन 2017 ते मार्च 2023 पर्यंतच्या दिलेल्या लाभार्थ्यांच्या फॉर्मचा विषय असताना जिल्हा व तालुका आरोग्य खात्याकडून मार्च 2023 नंतरच्या लाभार्थ्यांची माहिती देऊन मूळ विषयाकडून जनतेचे लक्ष हटविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे.
माहितीच्या अधिकारात मिळालेल्या अजून एका माहितीमध्ये कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रवीण भोईर यांनी शासकीय पैशांचा अपहार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भोईर यांनी ऑफिसमधल्या फिरती रजिस्टरमध्ये बऱ्याच महिन्यांमध्ये कोणतीच फिरती लिहिलेली नसताना सुद्धा वर्षानुवर्षे खोटी फिरतीची बिल टाकून भल्यामोठ्या शासकीय रकमेचा अपहार केला आहे. तसेच काही ठिकाणी फिरती रजिस्टरमध्ये व फिरती बिलांमध्ये एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी फिरती दाखविली आहे व रजेवर असतानासुद्धा फिरती दाखवून बिलांचे पैसे उकळल्याचे दिसते आहे. एकही फिरती बिलावर कार्यालयाचा आवक शिक्का नाही. अशी बिल कोणी तपासली व पास केली हे शोधणे गरजेचे आहे. हीच गत कंत्राटी तालुका लेखापाल यांची सुद्धा आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे बिनबोभाटपणे शासकीय पैशाचा अपहार करणाऱ्या या दोन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आता आरोग्य खाते काय कारवाई करणार ? हे बघणे गरजेचे आहे. एकंदरच कर्जत आरोग्य खात्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामावर कोणाचाच वचक नसून तेथे मनमानी कारभार चालू असल्याचे दयनीय चित्र समोर आले आहे.